(एक हजार पाचशे रक्तदानाचे उद्दिष्ठ)
[पंढरपूर // प्रतिनिधी]: सध्या जगभरामध्ये व देशात कोव्हीड-19 या विषाणूचा संसर्ग पसरलेला असून त्याची तीव्रता दिवसेनदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीमध्ये रूग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने राज्याचे मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करणेबाबत जनतेस आवाहन केलेले असून दि.01 जून ते 10 जून या कालावधीत विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे या संस्थेच्या माध्यमातून विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यस्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, सध्या जगभरामध्ये कोव्हीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. आपल्या देशात व राज्यामध्ये देखील या विषाणूचा संसर्ग दिवसागणीक वाढत असून या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी लॉकडाऊन जाहीर केलेले असून संसर्ग रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. अशा स्थितीमध्ये कोरोना बाधीत तसेच इतर रूग्णांवर उपचारा दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविला जाऊ शकतो. विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे या सेवाभावी संस्थेच्या वतीने वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करण्यात येत आहे. सन 2011 मध्ये माढा तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून उच्चांकी 10 हजार रक्त पिशव्यांचे यापूर्वी संकलन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या रक्ताचा गरजू रूग्णांना लाभ होत आहे.
रक्तदानाचे ठिकाणी केंद्र व राज्यशासन यांनी कोव्हीड-19 या विषाणूचा संसर्ग टाळणेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सींग, मास्क व इतर सुचनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. रक्त संकलनासाठी स.म.शंकरराव मोहीते पाटील ब्लड बँक, अकलुज, पंढरपूर ब्लड बॅक,पंढरपूर, श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक, बार्शी, भगवंत ब्लड बँक,बार्शी, डॉ.हेडगेवार ब्लड बँक, सोलापूर, सिध्देश्वर ब्लड बँक, दमाणी ब्लड बँक,सोलापूर, अश्विनी ब्लड बँक, सोलापूर, सरजूबाई बजाज ब्लड बँक,पंढरपूर व मातृछाया ब्लड बँक,माढा उपस्थित राहणार आहेत. दि.01 जून ते 10 जून या कालावधीत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एक हजार पाचशे रक्तदान करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केलेले आहे. तरी सर्व इच्छुक रक्तदात्यांनी कारखान्याचे शेती विभागाचे गटसेंटरशी संपर्क करून नाव नोंदणी करावी व रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने रक्तदान करणेचे आवाहन केले. तसेच कोव्हीड या विषाणूपासून बचाव करणेसाठी आपली व आपल्या कुंटुंबाची जरूर ती दक्षता घ्यावी असे आवाहन याप्रसंगी आ.शिंदे यांनी केले.
सदर प्रसंगी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस.रणवरे हे उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.