मुख्यमंत्री साहेब महादेव कोळी जमातीला दिलेले आश्‍वासन पाळा अन्यथा आषाढी एकादशीला आम्हास ‘कोरोनाग्रस्त’ करा!-गणेश अंकुशराव



पंढरपूर // प्रतिनिधी

आषाढी एकादशी दिवशी श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापुजेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येणार आहेत असे समजते. त्यांनी पंढरी येथील सभेमध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीला न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते, ते मुख्यमंत्री साहेबांनी पाळावे. अन्यथा पंढरीत आल्यानंतर आषाढी एकादशी दिवशी वर्षानुवर्षे अन्याय सहन करत जगणार्‍या, न्याय  न मिळालेल्या आम्हास ‘कोरोनाग्रस्त’ करा. अशी विनंती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

 आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांचा जातीच्या दाखल्यांसाठीचा लढा चालु आहे. जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात, आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणीक शिष्यवृत्ती सुरु करणेबाबत, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेच्या वाळवंटातील स्मारक उभारणेसंदर्भात व चंद्रभागेवरील नियोजीत पुंडलिक सेतु उभारणेचा निर्णय रद्द करणेबाबत शासनाने योग्य ती पावले त्वरीत उचलावीत. जातीचे दाखले द्यावेत. या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने श्री.ठाकरे यांच्या पंढरीत झालेल्या सभेदरम्यान देण्यात आले होेते. यावेळी वरील सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होेते.

 महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने समाजाचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी वारंवार लोकशाही मार्गाने आंदोलने केली, निवेदनं दिली. कांहीजणांना आंदोलनाच्या इशार्‍यानंतर जातीचे दाखले मिळाले; तरीही अद्याप अनेकजण जातीच्या दाखल्यापासुन वंचीत आहेत. याचबरोबर वरील अनेक प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत. आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या बाबीचा सारासार व सहानुभुतीपुर्वक विचार करुन ठाकरे सरकारनी तरी आमच्या प्रलंबीत मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा आम्ही मुख्यमंत्री महोदय शासकीय महापुजेसाठी पंढरीत आल्यानंतर शासकीय नियम पाळुन, सोशल डिस्टन्स चा अवलंब करत मुख्यमंत्री साहेबांची भेट घेवु. यावेळी एकतर आमच्याशी आमच्या प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करा, प्रश्‍न सोडवा अन्यथा आम्हाला कोरोनाग्रस्त करा. आमच्या मागणीचा विचार नाही झाला तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करुन आमची व्यथा मांडु. असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

चौकट:- सर्व जग जरी कोरोना विषाणुला घाबरून चिंताग्रस्त असले तरी सुध्दा आम्हा महादेव कोळी जमात बांधवांना मात्र जिवंतपणीच मरणयातना सहन कराव्या लागत असल्यामुळे आम्हाला ‘कोरोना’ पेक्षा जगायची भीती वाटत आहे. त्यामुळे आम्हास जर शासनाकडून न्याय मिळत नसेल तर ‘कोरोना’ होऊन मरण पत्करणे योग्य वाटते. अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget