वृत्तसंस्था // प्रतिनिधी
लडाखच्या सीमारेषेवरील कुरापतीने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनी सैनिकांनी आता माघार घेतली आहे. अतिरिक्त सैन्यासह लडाखसीमाभागात तैनात असलेल्या हजारो चीनी सैनिक जवळपास दोन किमी अंतर मागे सरकले आहेत. सुरुवातीच्या काळात आक्रमक असणाऱ्या चीनकडून तीन-चार दिवसांपासून सीमारेषेवरील आरेरावी कमी झाली आहे. जाणून घेऊयात नेमके कोणत्या कारणामुळे चीनने माघार घेण्याची भूमिका घेतली असेल यावर एक नजर...
लडाखच्या सीमारेषेवर चीन सैन्याकडून सुरु असलेल्या हालचाली थांबण्यामागे प्रमुख तीन कारणे आहेत.
त्यातील पहिली गोष्ट ही की, चीनकडून सीमारेषेवर हालचाली सुरु असल्याचे निदर्शनास येताना भारतीय लष्करही चीनचा सामना करण्यासाठी सज्ज झाले. लडाख परिसरात 5 मे रोजी तर सिक्कीम परिसरात 9 मेला चीनी सैन्य आणि भारतीय लष्कर यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. सिक्किमचा वाद वाढला नाही पण लडाख परिसरातील गलवान आणि प्योंगयांग शो तलाव परिसरात चीनकडून आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. भारतावर दबाव आणण्यासाठी चीनने या परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात केले होते. चीनकडून जवळपास 5 हजार सैनिक लडाखच्या सीमारेषेवर तैनात केल्याचे बोलले जात आहे.
चीनच्या हालचालीनंतर भारतानेही सीमारेषेवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय घेतला. चीनचा सामना करण्यासाठी सक्षम असणारी युद्ध सामग्रीचीही तयारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. यासह भारताने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्नही सुरु ठेवला. दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये लडाख सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 जूनला खास बैठक होणार आहे. लडाखच्या वादग्रस्त मुद्यावर आतापर्यंत दहावेळा चर्चा झाली आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्वच राष्ट्रांना फटका बसला आहे. चीनमध्येही आर्थिक गणिते कोलमडली आहेत. त्यामुळेच चीनला सध्याच्या घडीला आपल्या भूमिकेवर ठाम राहणे शक्य नाही. चीनच्या माघार घेण्यामागे हे देखील एक महत्त्वपूर्ण कारण आहे.
जगभरातून निर्माण होत असलेला दबाव हे चीनच्या माघार घेण्यामागचे आणखी एक कारण मानले जात आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन चीन-अमेरिका यांच्यातील वातावरण तापले आहे. अमेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी7 चा विस्तार करत भारत आणि अन्य दोन काही राष्ट्रांना या गटात सामील करुन घेण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे चीनवरील दबाव वाढला आहे. जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि तैवान चीनच्या विस्तारवादाला विरोध करत आहेत. त्यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोंडी झाली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.