सोलापूर // प्रतिनिधी
साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक व शाहीर म्हणून सर्वांना परिचित असून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाज सुधारणेसाठी केलेल्या कार्याची पोहोच पावती म्हणून शासनाने त्यांचे 2020 चे जन्म शताब्दीचे औचित्य साधून मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी आ.बबनराव शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.
अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले तांत्रिक दृष्ट्या
पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीत या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले. आण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पावधीत अनेक कथासंग्रह आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळालेला आहे.
मागास समाजातून नावारूपास आलेल्या आण्णाभाऊ साठे यांची लेखणी अत्यंत झुंजार असून त्यांनी वंचित समाजाच्या व्यथा,वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय प्रभावीपणे समाजापुढे मांडल्या. आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणेबाबत सर्वच स्तरातून अनेक वर्षापासून मागणी होत आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे म्हणजे त्यांनी समाजसुधारणेसाठी केलेल्या कार्याची पोहोच पावतीच आहे. आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून केंद्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी आ.बबनराव शिंदे यांनी केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.