वृत्तसंस्था // प्रतिनिधी
गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमधील भारतीय सैनिकांशी संवाद साधणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.
गलवान खोऱ्यात १४ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा प्रश्न सामोपचाराने सोडवायच्या, असे ठरले असले तरी भारत आणि चीनकडून लडाखमधील सैन्याची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांकडून सीमाभागात मोठ्याप्रमाणावर युद्धसामुग्री तैनात केली जात आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे हेदेखील लडाखचा दौरा करणार होते. परंतु, हे दोन्ही दौरे ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. यानंतर आता थेट पंतप्रधान मोदीच लेहमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.