पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना, बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले.
यावेळी अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, हभपतुकाराम महाराज भोसले, आनंद (दादा)चंदनशिवे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, माऊली हळणवर यांच्यासह अन्य ११ ते १२ लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस हेडकॉन्सेटबल परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड तपास करीत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.