शिक्षक अडकले कोरोनाच्या विळख्यात; शिक्षण विभाग काय भूमिका घेणार?


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

एकीकडे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोचावे, यासाठी झटणारे, तर दुसरीकडे घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती करणारे शिक्षक देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत अनेक सेवा अनलॉक होत असताना आवश्यकता असल्यास शिक्षकांना बोलवा, असे सांगतिले असतानाही शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. परिणामी पुण्या-मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण चालू असताना, शिक्षकांना शाळेत येण्याचे बंधन घालण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत.


राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालय यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सक्ती करू नये. असे असतानाही पुण्यासह सातारा, सोलापुर, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केली जात आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ, ही अतिशय गंभीर बाब आहे यावर काही ठोस उपाययोजना करायला पाहिजेत, यासाठी शिक्षक  हितकारणी संघटनेचे अध्यक्ष  प्रकाश पवार यांनी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना भेटून संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे.

पवार म्हणाले, "एक ऑगस्टच्या राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे शाळा, महाविद्यालयात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सक्ती करू नये असे असताना सुद्धा अनेक शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची मोठी किंमत शिक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मोजावी लागेल." 


आयडियल बहुजन टीचर्स असोसिएशनचे (महाराष्ट्र राज्य) राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "राज्यातील २२ जिल्ह्यातील १८ हजार शिक्षक असोसिएशनशी जोडले आहेत. त्यातील ६५ शिक्षक कोरोनाग्रस्त आहेत. परंतु राज्यातील सर्व शाळांमधील मिळून जवळपास पाच ते सात टक्के शिक्षक म्हणजेच साधारणत: सात ते आठ हजार शिक्षक सध्या कोरोनाग्रस्त आहेत, असा अंदाज आहे. शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करू नये, त्यातून काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे."

शिक्षकांना सक्ती नको

"शाळांमध्ये आवश्यकता असल्यास शिक्षकांना शाळेत बोलवा, हा आदेश कायम आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.  शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करू नये," असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget