सोलापूर // प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होटगी रोड येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर आसूड आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
यावेळी आ. देशमुख म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी ५८ मोर्चे काढण्यात आले. आमच्या सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करून आरक्षण दिले. उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. मात्र सुप्रिम कोर्टात बाजू मांडण्यात आपण कमी पडलो, असे वाटत आहे. मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत. वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देऊ, असे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. मराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सुप्रिम कोर्टाला विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी जे करावे लागेल ती करण्याची आपली तयारी आहे.
यावेळी समाजबांधवांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही. त्यासाठी आपण कोणताही त्याग करू.
मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल असे वाटत नाही.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.