वृत्तसंस्था // प्रतिनिधी
विधानसभेच्या दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी (स्व.) आमदार भारत भालके यांना श्रद्धांजली वाहताना मान्यवरांनी 35 गावांना पाणी मिळवून देणे हीच स्व. भालके यांना श्रद्धांजली असल्याची भावना व्यक्त केल्यामुळे 35 गावांच्या पाणी प्रश्नाला चांगले भविष्य दिसू लागले आहे. 2009 पासून ते आजतागायत पाण्यासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठवणारे (स्व.) आमदार भारत भालके या पाण्यावर भाष्य करताना म्हणाले होते, की माझा शाळेच्या अभ्यासापेक्षा 35 गावच्या पाण्याचा अभ्यास अधिक झाला. त्यामुळे या भागाला पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. या पाणी योजनेची फाईल त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत कायम होती; परंतु त्यांच्या अकाली जाण्याने या मतदारसंघाला मोठा धक्का बसला. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शोकप्रस्ताव मांडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की आज नाना आपल्यातून निघून गेले यावर माझा विश्वास बसत नाही. 2004 च्या पक्ष प्रवेशावेळी पंढरपूरला गेलो तर जमलेल्या लोकांचा उत्साह पाहता नाना विधानसभेत येणार अशी खात्री होती; परंतु दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला होता. परंतु पैलवान असलेला माणूस हार मानेल कसा. त्यातूनही ते प्रयत्न करत राहिले. त्यांचे काम चालू ठेवले. एखादा प्रश्न धसास लागेपर्यंत प्रयत्न करणे यातून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या बोलण्यात करारी बाणा व संवेदनशीलता होती. आपल्या आजारांकडे दुर्लक्ष करत मतदारसंघातील प्रश्नासाठी ते लढत राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की तीन वेळा पक्ष बदलून देखील लोकप्रिय असलेले आमदार भालके जमिनीवर पाय ठेवून चालणारे नेते होते. साखर कारखान्याच्या मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. सभागृहाने एका चांगल्या लोकप्रतिनिधीला गमावले. शरीराने भरभक्कम असलेला नाना मनाने दिलदार होता. सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडली होती. सलग तीन वेळा चढत्या मताने निवडून आले. गाव पातळीवरील त्यांचा संपर्क दांडगा होता. राजकीय, सामाजिक कार्यातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या विकासासाठी मोठा वाटा होता. "जमीन तुमचे खत आणि बेणे आमची' ही त्यांची योजना त्या भागांमध्ये फार लोकप्रिय झाली. कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने मला त्यांच्याशी जवळचा संबंध आला.जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, मंगळवेढ्यातील 35 गावांना तत्त्वतः पाणी देण्यासाठी आम्ही मान्यता दिली. परंतु या गावाला पाणी देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. शेवटच्या घटकापर्यंत लोकहितासाठी झटणारा नेता अशी त्यांची ओळख होती आणि रखडलेल्या कामींसाठी पाठपुरावा, सर्वसामान्यांविषयी असलेली तळमळ पंढरपूरची जनता कायम लक्षात ठेवेल. विधानसभेचे सभापती नाना पटोले म्हणाले, शांत, संयमी व अभ्यासू अशी त्यांची प्रतिमा होती. 39 गावांना पाणी मिळावे यासाठी आग्रही भूमिका होती. त्यासाठी ते विधानसभेत सातत्याने आवाज उठवत होते. मी त्यांना तुमचा प्रश्न निकाली काढू, अशी विनंती करत त्यांना बोलायची संधी दिली असता त्या पाण्यावरच आक्रमकपणे बोलले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.