वृत्तसंस्था // प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार शिवेसनेचेच निवडून येतील, अशी ग्वाही आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली. मात्र, जिल्ह्यातील सहापैकी सांगोला वगळता एकाही ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले नाही. हा पराभव जिव्हारी लागला, त्यातच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल ही त्यांची आशाही फोल ठरली. तेव्हापासून संपर्कप्रमुख तानाजी सावंत संपर्काबाहेरच असून त्यांचे बंधू जिल्हा सन्मवयक हेही दिसले नाहीत, अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी स्थापन केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात दोन्ही कॉंग्रेस यशस्वी ठरले. शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री केल्याशिवाय पक्षातील नाराजी दूर होणार नाही, असा विश्वास दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांना होता. त्यानुसार उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, तर पर्यटन मंत्री तथा अन्य विभागाचे मंत्री म्हणून तानाजी सावंत यांची चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिल्याने सावंत यांचा भ्रमनिराश झाला. तत्पूर्वी, मोहोळ, करमाळा, शहर मध्यमध्ये उमेदवारी देताना बंडखोरी होणार नाही, याची माहिती असतानाही सावंतांनी नाराजांची नाराजी दूर केली नाही. दुसरीकडे बार्शीतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माढा मतदारसंघात सावंत यांच्या कुटुंबियांचे राजकारण असूनही तिथे पक्षाला यश मिळाले नाही. त्यानंतर उमेदवारी देताना सावंतांनी मनमानी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केली. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करुन त्यांच्या पुन्हा समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून प्रयत्न अपेक्षित होते. मात्र, तसे प्रयत्न न झाल्याने राज्यात सत्ता असतानाही पदाधिकाऱ्यांना सत्तेचा फिल येत नसल्याचे चित्र आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.