(४ कुत्र्यांचा पाडला फडशा)
सोलापूर // प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वांगी परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी (ता. 18) बिटरगाव - वांगी परिसर येथे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण तालुक्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र पुन्हा आज शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी वांगी नंबर एक येथे मयूर जाधव यांच्या वस्तीजवळ बिबट्याने चार कुत्री मारले आहेत. तर ज्या ठिकाणी राखुंडे वस्ती येथे बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या, त्याच परिसरातील शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. वांगी परिसरात असलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, एका बिबट्याचा बंदोबस्त केल्यानंतर सध्या वावरत असलेल्या बिबट्यांबाबत वन विभागाच्या वतीने कोणत्याही ठोस उपाययोजना सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एका बिबट्याला ठार मारण्यास जरी यश आले असले तरी गेल्या चार - पाच दिवसांपासून वांगी परिसरात बिबट्या असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. या बिबट्याने चार कुत्री मारली असून, या भागातील वातावरण अतिशय भयभीत झाले आहे. मात्र वन विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची दखल अद्यापही घेतली गेलेली नाही. जर वन विभागाने याची दखल घेतली नाही, तर या भागातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील.
महेंद्रपाटील, शेतकरी,बिटरगाव वा, ता. करमाळा, जि सोलापूर

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.