22 डिसेंबर 1913 रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड वाजून गेला होता. रामाची आरती झाल्यावर श्रीमहाराज सिंहासनावर बसले. ते जरा थकलेले दिसत होते. परंतु , नेहमीप्रमाणे , परगांवाहून आलेली कांही मंडळी दर्शन घेण्यास पुढे झाली. त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नतेने संभाषण करीत होते. यावेळी दर्शन घेणार्यांतील एका बाईच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज बोलले , " माय ! असें कां ? " तिने उत्तर दिले , " महाराज ! आपण आतां जाणार , आणि एक - दोन दिवसांतच , हे मी नक्की समजलें " तिला पुढे बोलू न देता ते बोलले , " माय ! देव ठेवील तसे रहावे ! पण बोलावणें येतांच आनंदाने जावे . " नंतर सर्वांना निजावयास जाण्यास सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले. बरोबर हरिपंत मास्तर , वामनराव ज्ञानेश्वरी , अम्मा वगैरे तीनचार मंडळी होती . " किती वाजले " म्हणून चौकशी करतां , " दोन वाजले " असे वामनरावांनी सांगितले. श्रीमहाराज दहा मिनिटें तक्क्याला टेकून बसले होते. नंतर ते म्हणाले , " मी जरा आडवा होतो . " असे म्हणून ते अंथरुणावर लवंडले. ते उताणेंच निजले होते. त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. चार वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि " श्रीराम श्रीराम " असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. पाच मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले.
श्रीमहाराजांना बरे नाही म्हणून चारपाच मंडळी खोलीमध्ये जागत बसली होती . त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले. सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्रीमहाराज एखाद्या योग्यासारखे दिसत होते. सव्वापाच वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. वामनरावांना ते म्हणाले , " वामनराव , आपण शौचमुखमार्जन उरकून घेवू . " , म्हणून दोघेही बाहेर गेले. श्रीमहाराजांनी अंगात कफनी घातली होती , डोक्याला उपरणे बांधले होते आणि पायांत वहाणा घातल्या होत्या. पंधरा मिनिटांनी ते परत आले . हातपाय धुवून रामासमोर जावून त्यांनी साष्टांग नमस्कार केला व " माझ्या माणसांना सांभाळ " असे त्याला म्हणाले. शेजारीच अम्मा उभी होती. खोलीमध्ये परत जाता जाता ते तिला म्हणाले , " अम्मा ! रामरायाची ही अखेरची सेवा बरें का ! " खोलीत आल्यावर पुन्हा ते आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पहात श्रीमहाराज म्हणाले ,
" जेथें नाम तेथें माझें प्राण ।
ही सांभाळावी खूण ।। "
वामनरावांचे पाहून बाकीच्या तिघां - चौघांनीही त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला , प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले , परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाहीत. श्रीमहाराजांनी डोळे झांकून घेतले त्यावेळी ' अमृत ' नांवाची उत्तम घटका सुरु झाली. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला , म्हणून जेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. भाऊसाहेबांनी गोठ्यावर रहात असलेल्या डॉ. जोशी यांना बोलावणे पाठवले आणि ते स्वतः निघाले. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्रीमहाराजांनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. अशा रीतीने , सहाला दहा मिनिटें कमी असतांना , जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येवूं पहात असतांना , गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला . वसिष्ठ - वामदेवादि भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अद्वितीय जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला.
देहांतून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी त्यांना कुशीमध्ये धरले होते. इतक्यात भाऊसाहेब तेथें आले. ते दृश्य पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. खरे पाहिले असता गोंदवल्यात त्यावेळी असणार्या सर्व माणसांपैकी फक्त भाऊसाहेबांनाच सोमवारचा दिवस कसा उजाडणार आहे याची स्पष्ट कल्पना होती , परंतु ज्या प्रसंगाची आठवण चाळीस वर्षांनी उजळली तरी त्यांच्या पोटातून भडभडून येई तो प्रसंग डोळ्यासमोर पहात असतांना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ! भाऊसाहेबांच्या मागोमाग डॉ. जोशीदेखील तेथे आले. भाऊसाहेब मोठ्या काकुळतीने त्यांना म्हणाले , " डॉक्टर ! जरा नाडी बघा ! " डॉक्टरांनी कानाला नळी लावून त्यांची छाती बघितली , आणि तोंडाने शब्द न बोलता नुसत्या हातांनी " सगळे संपले " म्हणून सांगितले. डॉक्टरांनीच त्यांना पलंगावर नीट निजविले. भाऊसाहेबांची खात्री होतीच , पण शरीरांत अजून उष्णता असल्यामुळे ही कदाचित् समाधी असावी असे काही लोकांना वाटले , आणि ते तेथेच नामस्मरण करीत बसले. साडेसहाच्या सुमारास श्रीमहाराजांना रामाच्या समोर आणून निजविले. सात वाजल्यानंतर अंग थंड पडू लागले. आतापर्यंत बरीच मंडळी तेथे जमली होती. सर्व मंडळीमध्ये दुःखांचा डोंब उसळला.
लगेच ही वार्ता सगळीकडे पसरली. लहान मुलें , बायका, पुरुष , सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून ओक्साबोक्शी रडू लागले. श्रीआईसाहेबांच्या शोकाची आपण कल्पनाच करू शकत नाही. असे काही होईल ही कल्पनादेखील त्या माऊलीला नव्हती. आपला त्राता गेला , आपला आधार तुटला , आपला कैवारी नाहीसा झाला , आपला मायबाप हरपला , असे सर्वांना वाटून सगळीकडे ओकें ओकें वाटू लागले. श्रीरामरायाने प्रयाण केल्यावर मागें अयोध्या जशी निष्प्राण झाली तशी गोंदवल्याची स्थिती झाली . भक्त मंडळींना एवढा आघात झाला की , त्यांची मति गुंग होवून गेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण कल्पनाच त्यांना आली नाही !
श्रीमहाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा अत्यंत प्रसन्न असून त्यांच्या वदनमंडलावर मोठे तेज चढले होते. मृत्यूची कोणतीही चिन्हें त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजलेच आहेत असे पहाणार्याला वाटे. नवू वाजल्यानंतर , ' असे स्वस्थ बसून कसे चालेल ? ' हा विचार करुन भाऊसाहेबांनी तारा करण्यासाठी दहीवडीस मनुष्य पाठवला. पंढरपूर , पुणे , गदग , कर्हाड वगैरे ठिकाणी तारा पाठविण्यात आल्या. . दहा वाजल्यापासून त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येवू लागल्या. बारा वाजून गेल्यानंतर भाऊसाहेबांनी मुक्ताबाईंची समजूत घातली आणि भात व पिठलें शिजवून लहान मुलांना व आजारी माणसांना जेवायला घातले.
आप्पासाहेब भडगांवकरांना पंढरपूरास तार मिळाल्याबरोबर ते त्याच रात्री गोंदवल्यास पोंचले. ते आल्यावर सर्वांच्या विचाराने असे ठरले की श्रीब्रह्मानंदबुवांची वाट पहावी. म्हणून कडुलिंबाच्या पाला घालून शरीर झांकूनठेवले. बरीच मंडळी आळीपाळीने भजन व नामस्मरण करीत शेजारी बसली होती.
इकडे गदगला सोमवारी पहाटे चार वाजताच श्रीब्रह्मानंदबुवा उठले , त्यांनी स्नान केले आणि देवघराचे दार लावून ते ध्यानस्थ बसले. दहा वाजता ते बाहेर आले आणि " मी बेलधडीला जातो " म्हणून तसेच घराबाहेर पडले. ते बाहेर पडल्यावर थोड्या वेळाने तार आली. त्यांचे पुतणे भीमराव यांनी ती वाचली आणि नागप्पा नांवाच्या माणसाबरोबर लगेच त्यांच्याकडे पाठवली. दोनतीन मैल पळत गेल्यावर नागप्पाला श्रीब्रह्मानंदबुवा दिसले..त्याने टाळ्या वाजविल्या , तेंव्हा मागे कोण पळत येत आहे हे पहाण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले. नागप्पा जवळ आल्यावर ते म्हणाले , " कां रे , इतका धांवत कां आलास ? " त्याने सांगितले , ' ही गोंदवल्याहून तार आली आहे . श्रीमहाराज.......' त्याच्याने पुढे बोलवेना. हे ऐकले मात्र ! श्रीब्रह्मानंदबुवा मटकन् खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले. ते म्हणाले , " नागप्पा , महाराज चालते - बोलते परमेश्वर होते ! दोन रुपयांचे तिकीट काढले की ते डोळ्यांनी पहायला मिळत होते. आता ते कुठुन मिळणार ? अरे , ही काय बातमी तू घेऊन आलास ? " नंतर ते पुढे निघून गेले आणि तीन दिवस कोठेतरी गुप्त झाले होते.
पुण्यास त्यावेळी प्लेग असल्यामुळे गणपतराव दामले वगैरे मंडळी झोपडीत रहावयास गेली होती. तेथे थंडीत सकाळी साडेसहाच्या सुमारास श्रीपूर्णानंद स्वामी आले , त्यांनी दोन्ही हातांनी शंख केला आणि मोठ्याने ओरडून म्हणाले , " अरे गाढवांनो , निजलांत काय ! बघा , तिकडे गोंदवल्याचा सूर्य मावळला . " असे सांगून ते निघून गेले. अकरा वाजता मंडळींना तार मिळाली . जेथे तेथे तारा गेल्या . ज्यांना ज्यांना ही बातमी कळली , तेथे प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज गेले हे ऐकून काही लोकांना मूर्छा आली. सर्व ठिकाणांहून मंडळी गोंदवल्यास येण्यास निघाली. , पण बर्याच जणांना काहीतरी अडचणीमुळे वेळेवर गोंदवल्यास येता आले नाही. ( त्यावेळी मोटारी नसल्यामुळे कोरेगावहून बैलगाडीने गोंदवल्यास यावे लागे ., त्यासाठी एक सबंध दिवस जाई . )
सोमवारचा दिवस तर गेलाच , पण सोमवारची रात्र पण तशीच गेली. मंगळवारचा दिवस उजाडला तरी श्रीब्रह्मानंदबुवांच्या येण्याचा संभव दिसेना . मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेवून त्याच दिवशी अंत्यसंस्कार करायचे ठरविले. रविवारी संध्याकाळी श्रीमहाराज गोठ्यावर जाऊन बसले होते . त्यावेळचे त्यांचे शब्द ऐकून , ज्या जागेवर ते बसले होते , ती जागा दहनभूमी म्हणून ठरविली. मोठे शोभिवंत विमान करुन त्यामध्ये त्यांना बसविले. कपाळाला बुक्का लावला. गळ्यात तुळशीचा मोठा हार घातला. त्यांची पूजा व आरती केली , आणि ' जानकीजीवन स्मरण जय जय राम ' असे भजन करीत , गुलाल , बुक्का आणि फुलें उधळीत सर्वजण निघाले. गांवातून मिरवीत विमान दहनभूमीवर आणले. जागा गोमयाने सारवून , रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून श्रंगारली होती. तेथे आल्यानंतर थोडे भजन झाले. श्रीमहाराजांचा चुलतभाऊ श्रीहरि याने सर्व संस्कार यथासांग केला आणि शरीर चितेवर ठेवले. अग्नीनारायण भडकायला काही वेळ लागतो काय ? दुपारी तीन वाजण्याची वेळ होती आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रुप घेऊन आकाशाकडे धावू लागल्या. चिता पेटवल्यावर भवानराव बेफाम झाला आणि आंत उडी टाकण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला चार माणसांनी आवरुन धरले होते. तसाच श्रीमहाराजांचा कुत्रा पण वेड्यासारखा चितेच्या भोवती घिरट्या घालीत होता. संध्याकाळी सात वाजेपर्यंत जळून चिता शांत झाली.
तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करुन भरुन ठेवण्यात आल्या. भवानराव समाधीस्थानापाशी अस्थि जतन करुन असे व त्यांना प्राणाबरोबर सांभाळीत असे. प्रयागास नेण्यास कोणी त्या मागितल्या तर तो चक्क ' देत नाही ! ' म्हणून सांगे. अखेर श्रीब्रह्मानंबुवांनी त्याला पत्र लिहीले व अस्थि हरिपंत मास्तरांना देण्यास आज्ञा केली तेंव्हा त्याने मुकाट्याने त्या मास्तरांच्या स्वाधीन केल्या. मास्तर निघाले व त्यांचा मुक्काम हर्द्यास झाला. पूर्वी श्रीमहाराज तेथे असतां श्रीआनंदसागरांच्या अस्थि आल्या होत्या , त्यावेळी ते बोलले होते , " या इथेच असू द्या , मी प्रयागला स्वतः जाईन त्या वेळी त्या घेवून जाईन ." पण नंतर श्रीमहाराज गोंदवल्यास आले व पुन्हा प्रयागला गेले नाहीत ., म्हणून हर्द्यास कपाटात ठेवलेल्या श्रीआनंदसागरांच्या अस्थिदेखील या वेळी हरिपंतांनी आपल्याबरोबर घेतल्या , व अशा रीतीने गुरु - शिष्य अखेर बरोबर प्रयागला गेले. भय्यासाहेब इंदूरकर , कुंभोजकर , पटाईत मावशी , इंदूरची ताई , मसुरियादीन शिवमंगल , बाबूभट , वगैरे बरीच मंडळी बरोबर गेली व नामाच्या गजरात श्रीमहाराजांच्या अस्थि गंगेत सोडल्या. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला , त्या देहाचे सर्व भौतिक अवशेष नाहीसे झाले .
तनू जीर्ण झाली , बहु कार्य केले ।
रघूनायके शीघ्र पाचारियेलें ।।
तदा रामरुपीं समाधिस्थ होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति ।।

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.