वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा-पंढरपूर एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. यात बस चालक जखमी झाला. त्याही अवस्थेत चालकाने बस पुढे नेत घाटातून येणाऱ्या इतर वाहनांना धोक्याची माहिती दिली. बस घाटात थांबली असती, तर काहीतरी विपरीत घडले असते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा आणि सोलापूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
रात्री पंढरपूरमधून प्रवासी घेऊन एसटी बस साताऱ्याकडे येत होती. बस पिलीव घाटातून मार्गस्थ होत असतानाच 10 ते 15 हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यात बसची पुढील काच फुटून चालक जखमी झाला. धोका जाणवल्याने चालकाने बस तशीच पुढे दामटली. पुढे जात चालकाने घाटातील धोक्याची माहिती इतर वाहन चालकांना देणे सुरू केले. यामुळे घाटातील वाहतूक काही वेळातच ठप्प झाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस आले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. घाटात शोध घेतल्यानंतर घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. बसवरील दगडफेक लुटमारीच्या उद्देशाने झाल्याची चर्चा असली तरी त्याला दुजोरा मिळाला नाही.
दगडफेकीत एक दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. दरम्यान, काही हल्लेखोरांनी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच एसटीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोड्याचा प्रयत्न केला. माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी दाखल असून लवकरच परिसरात कोंबिग ऑपरेशन राबविले जाणार आहे, तसेच हा दरोडा नसून अज्ञातांनी बसवरती केलेला हल्ला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माहीती दिली. दगडफेक करणाऱ्यांचा सातारा आणि सोलापूर पोलिस संयुक्तपणे शोध घेत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.