पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही कोरोना चाचणी सर्व व्यापारी व दुकानदारांसाठी सक्तीची केली आहे. आजपासून पुढील तीन दिवसांमध्ये कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, दुकान सील करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पंढरपूरकरांची चिंताही वाढू लागली आहे. सध्या शहर व तालुक्यात सुमारे 500 हून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सुमारे पाच हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील सुमारे तीन हजार 500 छोट्या- मोठ्या दुकानदारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. येथील उपजिल्हा आणि नगरपालिका रुग्णालयात कोरोना टेस्ट केली जाणार आहे. यासाठी आजपासून पुढचे दिवस कॅम्प लावण्यात आला आहे. यादरम्यान शहरातील दुकानदारांनी स्वतः व आपल्या कामगारांची कोरोना चाचणी करावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
चाचणी केल्यानंतर दुकानदारांनी कोरोना चाचणीचे सर्टिफिकेट दुकानात दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. ज्या दुकानदाराकडे कोरोना चाचणी केलेले सर्टिफिकेट नसतील अशी दुकाने सील करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.