वृत्तसंस्था // प्रतिनिधी
बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेजसमोर असलेल्या अल्पाईन हॉस्पिटललगतच्या बंगल्यात 18 वर्षीय तरुणी आणि तिच्या 16 वर्षीय भावाची अज्ञातांनी चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. हा धक्का्दायक प्रकार मंगळवारी रात्री आठ वाजता उघडकीस आला. या मुलांचे आई-वडील शेतीकामानिमित्त गावी गेलेले होते. हे दोघेच भाऊ-बहीण घरी होते. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपींनी हे खून केले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्ती केला. घरातून दीड किलो सोने, रोख रक्कजम आणि मोबाईल गायब आहे.
किरण लालचंद खंदाडे (18) व सौरभ लालचंद खंदाडे (16, रा. किरकोनबेननगर, अल्पाईन हॉस्पिटलजवळ, बायपास) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, लालचंद खंदाडे हे शेती व्यवसाय करतात. जालना जिल्ह्यातील पाचणवडगाव येथे त्यांची शेती आहे. ते पत्नी अनिता, दोन मुली व एक मुलासह किरकोनबेननगर येथे भाड्याने बंगला घेऊन गेल्या चार वर्षांपासून राहत होते.
सध्या शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खंदाडे हे पत्नी अनिता व मोठ्या मुलीला घेऊन गावी गेले. घरी मुलगी किरण आणि मुलगा सौरभ हे दोघेच होते. आम्ही रात्री परत येतो, तोपर्यंत घरातच थांबा, असे त्यांनी आपल्या मुलांना सांगितले होते.
गावाकडील काम संपल्यानंतर सायंकाळी लालचंद खंदाडे हे गाडीने परत औरंगाबादच्या दिशेन निघाले. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी परत आले. घराचा मुख्य दरवाजा उघडाच असल्याचे पाहून त्यांना संशय आला. घरात घुसताच पहिल्या तळमजल्यावरील बाथरूमजवळ मुलगी किरण आणि मुलगा सौरभ हे दोघे रक्ताळच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्तं डॉ. राहुल खाडे, सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सहकार्यां सह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मुलांचे मृतदेह घाटीत पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दीड वाजता झाले होते बोलणे
खुनाचा हा प्रकार दुपारी दीड वाजेनंतर घडलेला आहे. कारण दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी मयत किरणने आईला मोबाईलवर संपर्क साधून जेवण झाले का, अशी विचारणा केली होती. त्यावेळी आई आणि मुलीत काही वेळ बोलणे झाले. आम्ही रात्री लवकर येतो, असे आईने किरणला सांगितले होते.
दोघांचेही गळे चिरलेले
घटनास्थळी चार चहाचे कप आढळले. यावरून हल्लेखोर हे ओळखीचे असावेत असा कयास आहे. किरण आणि सौरभ या दोघांचे गळे चिरलेले आढळून आले. त्यामुळे मोठा रक्त स्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झालेला होता. किरणचा गळा चिरण्यापूर्वी तिच्या डोक्यात काही तरी जड वस्तूने जोरदार प्रहार केलेला असल्याचेही आढळून आले.
चोरट्यांकडून पाळत ठेवून कृत्य
चोरट्यांकडून पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. घरातून दीड किलो सोने, सहा हजार रुपये रोख आणि मयत किरणचा मोबाईल चोरट्यांनी पळविला आहे. या दोन्ही मुलांचे आई-वडील गावाला गेले आहेत. दोन्ही मुलेच घरी आहेत, याची चोरट्यांनी आधी पाहणी केली असावी. त्यानंतर संधी साधून चोरटे घरात घुसले असावेत. चोरट्यांना पाहून या भावाबहिणीने प्रतिकाराचा प्रयत्न केला असावा, तेव्हा चोरट्यांनी दोघांचे गळे चिरून हत्या केली आणि मग घरातील सोने, रोख रक्कंम व मोबाईल चोरून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्तल केला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.