वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्याचा वेग वाढल्याने मंगळवार, 16 जूनपासून गुरुवार, 18 जूनपर्यंत तीन दिवस राज्यात धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दिला.
अरबी समुद्र पार करीत मान्सूनचे वारे वेगाने देशाच्या 60 टक्के भागात सोमवारी पोहोचले. केरळपासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणापर्यंत मान्सूनने धडक मारली. अरबी समुद्रात वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने 16 ते 18 जून या तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार आहे.
कोकण किनारपट्टीला 16 ते 18 जूनदरम्यान वादळी वारे अन् अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
देशात टॉप टेनमध्ये चंद्रपूर
गेल्या चोवीस तासांत पावसाच्या सरासरीत देशात टॉप टेनमध्ये केरळमधील कन्नूर (64 मि.मी.), तर महाराष्ट्रातील चंद्रपूर (63 मि.मी.) दुसर्या स्थानावर, वाशीम (60 मि.मी.) सातव्या स्थानावर आहे, असा अहवाल 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने दिला आहे.
पुणे शहरात मात्र मध्यम पाऊस
16 ते 21 जून या सहा दिवसांत पुणे शहरात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा राहील. मात्र, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान वेधशाळेने दिला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुरात धो धो पाऊस
अरबी समुद्रातील वार्यांच्या चक्रीय स्थितीमुळे कोकणासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात 48 ते 72 तास धो धो पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात अतिवृष्टी (76 ते 100 मि.मी.), तर उर्वरित सर्व राज्यात 51 ते 75 मि.मी. इतका पाऊस तीन दिवसांत पडू शकतो.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.