यात्रा काळात अध्यक्षपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा मंदिर समितीने अन्वयार्थ काढला
पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दर्शनासाठी व यजमान पुजेसाठी बंद ठेवली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सर्व मंदिरातील दररोजच्या नित्योपचार, महापूजा पुजारीच करेल असे मा.मुख्यमंत्री यांचे आदेश असताना लॉकडाऊनच्या काळात चैत्र वारीच्या एकादशीस मंदिर समितीने सदस्याच्या हस्ते नित्य महापूजा केली तद्नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आदेशाचा मंदिर समितीने अन्वयार्थ काढून पुजाऱ्यांना सपत्नीक चंदन ऊटी पुजेचे यजमान पद देवून ऊटी पुजेची सांगता झाली. तीच पध्दत रूक्मिणीकडे झाली.मंदिर समितीच्या अध्यक्षाला, सदस्याला, कार्यकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात यजमान म्हणून महापुजा व चंदन ऊटी पुजा करता येत नाहीत. अशा समितीतील कर्मचाऱ्याला सपत्नीक यजमान पुजा कशा करता येईल ? याचा अर्थ पुर्वी चैत्र एकादशीस झालेल्या कृत्याबद्दल सहानुभूती मिळावी म्हणून पुजाऱ्याच्या हस्ते सपत्नीक यजमानकृत्य केले आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर सरकारी प्रशासनाचा ताबा आहे. मंदिर जर खाजगी पुजाऱ्याच्या मालकीचे असले तर पुजाऱ्याला सपत्नीक पुजा करता आली असती. परंतू तसे झाले नाही.
विशेष म्हणजे कार्यकारी अधिकारी यांना अशा पध्दतीने वागण्यासाठी कोण चुकीचा सल्ला तर देत नाही ना ? असा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होत आहे. तसेच या पडद्यामागील सुत्रधार कोण आहे ? तसेच सध्या अनलॉक असल्याने भाविक येणार नाहीत परंतू आषाढी वारीच्या एकादशीला जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून आषाढी एकादशीच्या महापुजेबाबत मी पुर्वी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. त्याचा ही विचार करण्यात यावा.
पुर्वी आषाढी व कार्तिकी यात्रेलाच बडवे, उत्पात व सेवाधारी यांच्या वतीने नित्यपुजा होत असत. परंतू आता सरकारी प्रशासन असल्यामुळे नित्यपूजा ही सरकारचीच पुजा असल्याने आषाढी एकादशीला नित्यपूजा हीच सरकारी पुजा म्हणून संबोधण्यात यावे व त्याला सरकारी महापुजेचा दर्जा देण्यात यावा. मग आषाढीमध्ये लॉकडाऊन चालू राहिल्यास पुजारी यांच्याहस्तेच सरकारी महापुजा होणार काय ? त्यामुळे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यावरील ताण कमी होवून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांचा अधिक वेळ जाईल व तो आटोक्यात येवून पंढरपूर हे कोरोनामुक्त होईल. तसेच यात्रेच्या कालावधीत अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय शु.य.कण्व (प्रथम शाखा) परिषद नाशिक प्रणित पंढरपूर शहर कण्व परिषदचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे (शिंदे) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सदरच्या निवेदनाच्या प्रति ईमेलद्वारे शरदचंद्रजी पवार, सुशिलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर, सहअध्यक्ष व कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती व यांना पाठविलेल्या आहेत.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.