वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "मुंबईत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण वाढत होते. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने टास्कफोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे काही गोष्टींची कमतरता होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे व्हेंटिलेटरची मागणी खूपच होती. त्यानुसार मागणी केल्याप्रमाणे केंद्राकडून व्हेंटिलेटर्स आले आहेत."

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.