वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आणि स्वंयपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. या सगळ्यांवर उपचार सुरु आहे. तर स्वयंपाक करणाऱ्या महिलेवर वरळीतील डोम इथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान सुरक्षारक्षकांपैकी कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कराड दौऱ्यानंतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही कोरोना चाचणी त्यानंतर पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.
सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.