पंढरपूर // प्रतिनिधी
सध्या 115 टीएमसी पाण्यासाठी केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असून केवळ 7 टीएमसी एवढ्याच नीरा भीमा स्थिरीकरणाचे कामं करीत आहे . या प्रकल्पातून कोणत्याही दुष्काळी भागाचा फायदा होणार नसून केवळ एका मोठ्या नेत्याच्या तालुक्याला हे 7 टीएमसी पाणी वापरण्यास मिळण्यासाठी जनतेची दिशाभूल सुरु असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. या आरोपाचा रोख बारामतीकडे असून सध्या केवळ नीरेतील जादा होणारे पाणी उजनीत आणण्याची कामे अंतिम टप्प्यात आहे. तर मराठवाड्याकडे पाणी नेण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे. ही कामे पूर्ण होईपर्यंत हे जादाचे पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात मोहिते पाटील यांनी बारामतीकरांना नथीतून तीर मारले आहेत.
वास्तविक या प्रकल्पात कृष्णेतून 1 थेंबही पाणी येणार नसून पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील दुष्काळी जनतेला मिळणारे हे पाणी पुन्हा एक स्वप्नच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराचे पाणी दुष्काळी भागात आणले जाईल हे सांगणंही पूर्णपणे चुकीचे असून आताही सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी कर्नाटक आणि आंध्राकडेच वाहून जाणार असल्याचा दावा मोहिते पाटील यांनी केला आहे. मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी देणे गरजेचे असताना, हे फक्त 7 टीएमसी पाणी देण्याचे प्रकल्प सुरु करीत असल्याने यामुळे मराठवाड्याची फसवणूक असून यातील 1 थेंबही पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला मिळणार नसल्याने यातून जनतेची फसवणूक सुरु असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. वास्तविक विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकल्पाची उघड चेष्टा सुरु करीत बासनात गुंडाळून ठेवला. याचसाठी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी अकलूजच्या सभेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द मोहिते पाटील यांना दिला होता

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.