वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देशातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नवीन पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, काही काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा पुन्हा हाती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले.
या पत्रावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी ज्यांची नावे पत्रात दिली आहेत त्यांनी माफी मागावी अन्यथा राज्यात नेत्यांना मुक्तपणे फिरु देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे एक पत्र सार्वजनिक झाले आहे. काँग्रेस पक्षात नेतृत्व परिवर्तनाची मोठी मागणी होत असल्याची बाब पत्रातून समोर आली आहे. या पत्रामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांवर कडवट भाषेत टीका करत मंत्री सुनिल केदार यांनी ट्विट केले आहे.
काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. यात महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या नेत्यांची नावे आहेत.
काय म्हटले आहे सुनिल केदार यांनी ट्विटमध्ये?
काँग्रेस अध्यक्ष म्हणून आदरणीय सोनिया गांधीजी यांना माझा मन:पूर्वक पाठिंबा आहे. गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या कृतीबद्दल या नेत्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे. अशी मागणी सुनिल केदार यांनी ट्विटमधून केली आहे.
तसेच, माफी मागितली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाही. गांधी अध्यक्षपदावर असतील तरच काँग्रेस पक्ष भाजप सरकारविरोधात लढू शकतो. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाच्यामागे भक्कमपणे उभे राहण्याची ही वेळ आहे, असे सुनिल कदम यांनी दुसरे ट्विट करत म्हटले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा १० ऑगस्टला कार्यकाळ संपला. त्या हंगामी अध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा संध्या रंगली आहे. अशात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीडब्ल्यूसीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे एक पत्र सार्वजनिक झाले आहे. काँग्रेस पक्षात नेतृत्व परिवर्तनाची मोठी मागणी होत असल्याची बाब पत्रातून समोर आली आहे.
पक्ष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष होण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, अध्यक्षपदावर जर काँग्रेसचा इतर दुसरा नेता दावा करीत असेल तर पक्षात फेरबदलाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. राहुल यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास या आधीच नकार दिला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.