23 नेत्यांचे पत्र, गोपनीय पत्र चव्हाट्यावर आल्याने सोनिया भडकल्या
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावा आणि पक्षात संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्यात यावेत, अशी मागणी करणारे २३ काँग्रेस नेत्यांचे पत्र चव्हाट्यावर आल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत आपली पूर्णवेळ अध्यक्षपदी निवड करण्यात येऊ नये,असे सोनिया गांधी यांनी काही सहकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच हंगामी अध्यक्षपद सोडण्याचीही तयारी दर्शवल्याने पक्षात दोन तट पडले आहेत. या पत्रावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा या राज्यातील तीन नेत्यांच्या सह्या आहेत. या नेत्यांचे पत्र गोपनीय व अंतर्गत बाबीवर हाेते. मात्र, ते प्रसिद्धिमाध्यमांत गेल्याने सोनिया संतप्त झाल्याचे कळते.
राहुलला विरोध
पाच पानांचे हे पत्र आहे. यात दोन ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला संजीवनी देण्याचा मसुदा तयार केला आहे. यात थेट सोनिया अाणि राहुल यांच्यावर टीका नाही, परंतु पक्षश्रेष्ठी विशेषत: राहुल यांच्याविरोधात रोख असल्याचे दिसते.
राहुल, प्रियका गांधींचा नकार
राहुल आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वीच अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असावा असे दोघांनी स्पष्ट केले आहे. परंतु नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात सरळ सरळ दोन तट पडले असताना सोनियांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष हवा अशी एका गटाची मागणी आहे, तर दुसऱ्या गटाला गांधी घराण्यातील सदस्य अध्यक्ष म्हणून हवा आहे.
या आहेत मागण्या : पक्षाला संजीवनी देण्यासाठी फील्डवर सक्रिय अध्यक्ष हवा
पक्षाला संजीवनी देण्यासाठी सक्रिय आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे म्हणून पूर्णवेळ अध्यक्ष हवा आणि तो फील्डवर सक्रिय असावा.काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात यावी. राज्यांमधील नेतृत्वाला अधिक स्वातंत्र्य दिले जावे. पक्षाला नव्या जोमाने उभे करण्यासाठी व मार्गदर्शन मिळण्यासाठी नेतृत्वाची संस्थात्मक यंत्रणा तयार करावी. कार्यक्रम निश्चित करून भाजपला घेरण्याची व्यूहरचना तयार करावी.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दोघेही गांधी घराण्यातीलच अध्यक्ष असावा यासाठी आग्रही आहेत.
ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सर्व सहमतीने अध्यक्ष निवडला जावा असे मत व्यक्त केले. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहुल यांना पुन्हा अध्यक्षपद देण्याची मागणी केली.
या आहेत शक्यता :
१. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल अध्यक्षपदासाठी राहुल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडू शकतात.
२. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे किंवा मुकुल वासनिक यांची हंगामी अध्यक्षपदी निवड होऊ शकते
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.