वृत्तसंस्था // प्रतिनिधी
संपूर्ण जग कोरोना वैश्विक महामारीशी लढा देत असताना आपल्या देशात व राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोव्हीड सेंटरमधील कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशिय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत कुर्डूवाडी व माढा येथील कोव्हीड सेंटरसाठी ऑक्सिजन मशिनचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले कोरोनाचे पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्तांवर वेगवेगळ्या उपचार पध्दती करुन त्यावर मात केली जात आहे.आपले सोलापूर जिल्हामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून माढा मतदारसंघातील कुर्डूवाडी येथील संकेत मंगल कार्यालय, श्रीराम मंगल कार्यालय, माढा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरसाठी प्रत्येकी एक ऑक्सिजन मशिनचा पुरवठा करण्यात आलेला आहे. सध्या सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून ऑक्सीजन अभावी रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोव्हीड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना रूग्णांपैकी ज्या रूग्णांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत त्यांना या मशिनच्या साहाय्याने ऑक्सीजन पुरविला जाणार आहे.त्यामुळे रूग्णांची फार मोठी सोय झालेली असून रूग्णांचे प्राण वाचणे हे महत्त्वाचे आहे. सदर मशिन हवेतून ऑक्सिजन घेवून त्यावर कार्य करत असल्याने त्यास ऑक्सीजन सिलेंडरची वेगळी गरज नाही. तसेच सदर कोव्हीड सेंटरमधील रूग्णांना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढून त्यांना आनंद मिळावा म्हणून भजन किर्तन, भक्ती संगीत ऐकण्यासाठी जरूर ती साऊंड सिस्टीमची व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
या कोरोना पार्श्वभूमीवर कारखान्याने नेहमी सक्रीय सहभाग देवून सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने माढा मतदारसंघामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून 2 हजार 500 रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तसेच 30 हजार लोकांना हॅन्ड सॅनिटायझर व वाढदिवसाचे औचित्य साधून 30 हजार मास्कचा पुरवठा करण्यात आलेला आहे. कोरोना या आजाराचे पार्श्वभुमीवर सर्वांनी जरूर ती दक्षता घ्यावी अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
सदरप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस.रणवरे व खातेप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.