वृत्तसंस्था // प्रतिनिधी
गेले २ दिवस अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर, कंगना देखील आपल्या मतावर ठाम असून निकामी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने या वादाला वेगळे वळण दिले जात आहे, अशी भूमिका तिने मांडली.
सद्या ट्विटरसह प्रत्यक्षात देखील सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी तपासावरून सुरु झालेला हा वाद आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर मराठी-अमराठी होऊ लागला आहे. यानंतर, राज्यभरातून कंगनाच्या विरोधात तसेच काही प्रमाणात समर्थनार्थ भूमिका देखील मांडल्या जात आहेत.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील यावर आता टीका केली असून त्यांच्या टीकेचा रोख हा शिवसेनेवर असून काही लोकांना वाचवले जात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी, ' अलर्ट ! अलर्ट! कंगना तर एक कारण आहे, SSR आणि दिशा प्रकरणावरून लक्ष हटवायचे आहे, बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे..बाकी काही नाही! ' अशी खोचक टीका केली आहे.
दरम्यान, काल दिवसभरात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, यानंतर काही ठिकाणी कंगनाचा निषेध करताना तिच्या पोस्टरला चपलाने मारहाण करण्यात आली. यावरूनच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे ही अत्यंत हीन पातळी आहे, असे मत ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.