वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. अशातच आज ती मुंबईत दाखल होणार आहे. परंतु, त्याआधीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाचे कारण देत मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांनाच सारखा कायदा लागू होतो, अशी आशा आहे. महापालिकेची टीम आता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर जाणार का? निश्चितच नाही…एवढी हिम्मत ते कशी दाखवू शकतात. सबका टाइम आयेगा, असेही नितेश राणे यांनी ट्विट करत म्हणले आहे.
दरम्यान, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.