माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात गैरव्यवहार:माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर

 



सोलापूर // प्रतिनिधी 

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे सुरू आहेत. या कामांमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे. खासदार निंबाळकरांच्या या मागणीनंतर आता ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. 



केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर-मोहोळ, पंढरपूर-सातारा, धुळे-रत्नागिरी, पंढरपूर-जत, सांगोला-कुर्डुवाडी या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्ते बांधकामाला सुरवात देखील केली आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव केला जात आहे. माळशिरस नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये प्रतिगुंठा एक लाख रुपये तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रतिगुंठा चार लाख रुपये या दराने जमीन अधिग्रहण केली जात आहे. नगर पंचायतीच्या हद्दीमधील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे या वेळी खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 


पंढरपूर-मोहोळ आणि रत्नागिरी-धुळे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती असून, या दोन्ही मार्गांच्या कामाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही या वेळी खासदार निंबाळकर यांनी संसदेत बोलताना केली आहे. 


पंढरपूर-म्हसवड या मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या मार्गाचे काम देखील तातडीने पूर्ण करावे; अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले. 


तक्रारीनंतर लोकसभेत केली मागणी 

याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आपण राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget