वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सतत बदल होत आहेत. परतीच्या म्हणजेच ईशान्य मान्सूनची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. सोमवार (ता.७) रोजी रोजी महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्यामुळे धुळे, नंदूरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी २० ते ५० मि.मी. पावसाची शक्यता आहे. काही काळ उघडीप व त्यानंतर पाऊस अशी स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण साधारण राहील
ईशान्य मान्सूनची सुरुवात साधारणपणे १ सप्टेंबर ला होते. मात्र, राजस्थान, उत्तर भारत तसेच ईशान्य भारतात अद्याप हवेचे दाब कमी आहेत. काही ठिकाणी १००२ तर भारताच्या मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतके कमी दाब आहेत. या आणि पुढील आठवड्यात हवेच्या दाबात वाढ होऊन वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. सध्या वाऱ्याच्या दिशेत बदल झाले आहेत. धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, कोकणात आग्नेयेकडून तर उर्वरित भागात नैर्ऋत्येकडून आहे. त्यामुळे ईशान्य मान्सूनसाठी वातावरण अनुकूल होण्यास सुरुवात झाली आहे.
आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २६ ते २९ मि.मी. तर ठाणे व रायगड जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवार (ता.७) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २० ते ५० मि.मी. तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २२ ते ३३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६८ टक्के राहील.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.