राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं:प्रा.संग्राम चव्हाण



परतीच्या मान्सून च्या वादळी पावसाने महाराष्ट्रामध्ये रौद्र रूप धारण करून महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान करून कहर केला. सलग चोवीस तास पडलेल्या मुसळधार वादळी पावसामुळे सकाळी झोपेतून उठण्याच्या आतच अनेक शेतकऱ्यांची काढून पडलेली मका,सोयाबीन, कांदा यासारखी पिके पावसाच्या पाण्याने वाहून  गेली. वादळी पावसाची तीव्रता एवढी भयानक होती की जिल्ह्यातील सर्व नदी-नाले -ओढे यांना काही तासातच पूर आले. सीना नदीने स्वतःचे पात्र बदलले,त्यामुळे दहा गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला,भीमा माण नद्यांना महापूर आले. व जवळपास सर्वच पूर परिस्थिती हाताबाहेर गेली.अनेक लोकांची घरे पाण्याखाली गेली. शेकडो जनावरे वाहून गेली. शेतीचे बांध फुटले. जमिनी वाहून गेल्या. अनेक विहिरी काळाने बुजल्या. साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजी पुरात वाहून गेल्या. द्राक्ष बागांची पाने झडली डाळींब, शेवगा पिकांची फुले गळून गेली.जवळपास सर्वच बागा पाण्याखाली गेल्या. उभे ऊस,केळीच्या बागा पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे जमिनीतून उखडून नदी प्रवाहात वाहून गेल्या.अशा विविध प्रकारे परतीचा मान्सूनने सोलापूर जिल्ह्यामध्ये थैमान घातल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्याची गणती करता येत नाही.

                जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुःखाला पारावार उरला नसून प्रत्येक शेतकरी हा आता मात्र खऱ्या अर्थाने कफल्लक झाला आहे. नोटबंदी, लॉक डाऊन यामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे आधीच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले होते.त्यातच परतीच्या मान्सून रुपी आसमानी संकटाने जिल्ह्यातील शेतकरी पुरता संपला असून देशोधडीला लागला आहे.भारत हा कृषिप्रधान देश असून जर बळीराजाला पुन्हा उभा करायचं असेल तर त्याला राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी मिळून नुकसान भरपाई ची मदत अति तातडीने करणं गरजेचे आहे.अन्यथा देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा उपाशी राहण्याची वेळ त्याच्यावर आलेले आहे.नुकसानीचे चित्र अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे.ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ न घालवता शेतकऱ्यांना मदत पोहोचवावी तसेच त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केंद्राकडून सुद्धा भरीव मदतीचे पॅकेज मिळवण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करावा.झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी त्याची कर्जे भरू शकणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार कडून कर्जमाफी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा.विविध  कारणांमुळे दर दहा वर्षानंतर साधारणपणे सर्व शेतकरी कर्जाच्या खाईत जातात त्यामुळे दर दहा वर्षानंतर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे गरजेचे होऊन बसते.पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शेतकर्यांना संपूर्ण  कर्जमाफी जाहिर   करावी, शेतकर्यांना नवीन कर्ज मंजूर करून द्यावे  अशी प्रभावीपणे मागणी सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्रामदादा चव्हाण यांनी केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget