वृत्तसंस्था // प्रतिनिधी
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरात गुरुवारी विविध संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
समाजात दुही पेरण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या दोन्ही वारसांबद्दल वादग्रस्त विधान करून जाणीवपूर्वक अवमान केला आहे. तर सदावर्ते यांनी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध चालवला आहे, असा आरोप करीत राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात दुहीचे राजकारण मुळीच चालणार नाही. येथील सामाजिक ऐक्याची नाळ भक्कम आहे, अशा भावना नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह इतरांनी व्यक्त केली.
दसरा चौकात सायंकाळी झालेल्या या आंदोलनात महापौर निलोफर आजरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, विनायक फाळके, उमेश पोर्लेकर यांच्यासह मराठा समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.