वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अंबाबाई मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात पण लोकसहभागाशिवाय करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. करोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. परंपरेप्रमाणे या नवरात्रोत्सवात सर्व विधी करण्यात येतील. त्याचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकांत होईल, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले. नवरात्रोत्सव काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवरात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात अथवा पालखी सोहळ्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. दोन दिवसात मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. याचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.