वृत्तसंस्था // प्रतिनिधी
दिनांक २८/१०/१९६६ रोजी तीसरी मंझील हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या घटनेला ५४ वर्ष पूर्ण झाली.त्या दिवशीही शुक्रवार होता, फक्त तिथीने त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. या चित्रपटाने उत्पन्नाचे अनेक विक्रम निर्माण केले. विजय आनंदच्याच गाईडलाही उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकले. दोन दिग्गजाना नवी ओळख दिली. १) प्रेमनाथ जो आधी देमार चित्रपटात काम करायचा त्याला खलनायक ( चरित्र कलाकार ) म्हणून मान्यता मिळाली. त्या वर्षीचे चरित्र नायकाचे फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. २) राहुल देव बर्मन या असामान्य संगीतकाराला प्रथमच 'अ' वर्गातील संगीतकार म्हणून मान्यता मिळाली. त्यापूर्वीही त्याने प्रत्येक चित्रपटात चांगले संगीत दिले होते परंतु शम्मी कपूर सारख्या मोठ्या स्टारने त्याला प्रथमच स्वीकारले होते. या चित्रपटातील प्रत्येक गाणे हे संगीतातील एक नवा अध्याय होता. या चित्रपटातील पहिले रेकाॅर्डिंग *आ जा आ जा मैं हूँ प्यार तेरा* संपता संपता शम्मी नासिर हुसेनला ओरडत ओरडतच म्हणाला *'This is trend setting music'.* ते त्याचे शब्द पंचमने प्रत्येक गाण्यात खरे ठरवले. 'ओ हसीना' गाण्याच्या वेळी ग्लासवर चमचा वाजण्याचा आवाज हुबेहूब येईपर्यंत रात्री उशीरापर्यंत गाण्याचा टेक पंचमने ओके केला नव्हता. गीतकार मजरूह सुलतानपुरी , गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले. 'तुमने मुझे देखा' हे वास्तविकतः प्रेम व्यक्त करणारे गीत पण त्यात एक पॅथाॅस आहे आणि या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान झालेल्या शम्मी कपूरची पत्नी गीता बालीच्या मृत्यूने तो अधिकच गडद झाला. 'दीवाना मुझसा नही' आणि 'ओ मेरे सोना' ही महाबळेश्वर परिसरात चित्रीत झालेली दोन्ही गाणी अत्यंत गोड आहेत. यातील ' ओ मेरे सोना' हे गाणे लताजींकडे जाऊ शकले असते' पण रफी—लता या तत्कालीन वादामुळे तेही आशाजी.कडे गेले. त्यामुळे या चित्रपटात एकही लताजींचे गाणे नाही. 'देखिए साहिबों' हे सर्वात शेवटी चित्रीत झालेले गाणे रॅप प्रकारात मोडू शकते.म्हणजे पंचम काळाच्या कितीतरी पुढे होता हे सिध्द होते. हे गाणे, विजय आनंदने अमेरिकेत 'गाईड'चे फायनल काम अर्धे सोडून भारतात येऊन चित्रीत केले. कारण निर्माता नासिर हुसेनला या चित्रपटातील एक तरी गाणे चित्रीत करायची इच्छा होती आणि विजयला आपल्या दिग्दर्शनात कोणाचीही दखल नको होती. ( याच गाण्याच्या सेटवर नासिर हुसेनने आपल्या छोट्या बजेटच्या 'बहारोंके सपने' मधील लताजींच्या अप्रतिम 'क्या जानू सजन' या गाण्याचे चित्रीकरण केलय). तसेच या चित्रपटाचे टायटल म्युझिक अत्यंत आगळे वेगळे होते. ज्याचे पुढे अनेक संगीत दिग्दर्शकानी अनुकरण केले.या चित्रपटाच्या एल. पी. रेकॉर्ड मध्ये 'आ जा आ जा मैं हूँ प्यार तेरा' गाणे सोडता सर्व गाण्यांच्या आधीचे डायलाॅग्ज अंतर्भूत केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात एल. पी.मध्ये डायलाॅग्जचा अंतर्भाव प्रथमच झाला. पुढे 'शोले'च्या डायलाॅग्जची एल. पी. निघाली पण ती १९७५साली.असा हा ५० वर्षाचा झालेला अप्रतिम संगीत, विजय आनंदचे देखणे दिग्दर्शन, शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन आणि प्रेमनाथ यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला चित्रपट आणि संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीत दिलेली सुपर डुपर हिट एव्हरग्रीन गाणी रसिकांच्या मनावर यापुढेही अनेक वर्ष राज्य करतील यात मुळीच शंका नाही.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.