वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिर अखेर सुरू करण्यात आली आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी तालुक्यातील झरे गावात 17 नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली, असे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिले. या प्रकरणी शांताबाई मारुती मासाळ (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरं सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफ-स्वच्छता करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली. स्थानिकांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्या मित्रांना चपला बाहेर काढून मंदिरात जाण्याची विनंती केली. पण, यावरून दोन्ही गटामुळे वादाला सुरुवात झाली. चपला बाहेर काढण्यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले, दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.