वृत्तसंस्था // प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात आलेल्या निवार चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या चित्तूर आणि नेल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नदीच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागातील शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. आंध्रातील एरपेडू, मोदुगुला पाडू, कुम्मारी मिट्टा आणि चेन्नामपल्ली गावे पाण्याखाली गेले आहेत. पापानायडू पेटाजवळील सुवर्णमुखी नदीला पूर आल्याने मद्दीला पालेम आणि गोविंदपूरम गावात पाणी शिरले आहे. तसेच पचिकापलमच्या टीटीडी कल्याण मंडपमजवळ वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे.दुसरीकडे प्रसिद्ध तिरुमला येथेही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दृष्यमानता कमी झाली असून वाहतूकही मंदावली आहे. पावसामुळे तिरुमलाच्या दुसऱ्या घाट रस्त्यावर थांबलेल्या एका बोलेरो वाहनावर मोठा दगड पडला. त्यामुळे वाहनाची हानी झाली. गाडीतील पाच प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले. हे भाविक हैदराबादचे आहेत.दरम्यान, तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा टाकला होता. मंदिर ट्रस्टचे कर्मचारी यंत्राच्या साहाय्याने पुराचे पाणी ओसरण्यासाठी कामाला लागले होते. श्रीवरी मंदिरासमोर बऱ्याच वर्षांनंतर पाणी साचल्याची माहिती मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने राज्यात हाय अलर्ट सांगण्यात आला आहे. तिरुपती ते तिरुमला जाणाऱ्या भाविकांना अलीपिरी सप्तगिरी चेक पोस्टवरच ताकीद दिली जात होती. वाहनचालकांनी आपली वाहने कमी वेगाने चालवावी, असे आवाहन टीव्हीटीचे कर्मचारी करत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.