सोलापूर // प्रतिनिधी
15 मे पासून सुरू झालेला पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत सतत कोसळत राहिल्यामुळे अतिवृष्टी मुळे द्राक्ष बागायतदारांचे 100 टक्के नुकसान झाले असून त्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे 100% नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. ते पुढे म्हणाले की यावर्षीच्या पावसाळी हंगामामध्ये पावसाने विश्रांतीच न घेतल्यामुळे फळबागा विशेषतः द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. साधारणपणे एप्रिल महिन्यातील खरड छाटणी नंतर द्राक्ष बागेच्या भोदामधे मध्ये रासायनिक खते, शेणखते भरून घेतली जातात व तिथून पुढे पाच महिने विविध विद्राव्य अन्नद्रव्ये ठिबक सिंचन संचातून सोडून द्राक्षाची काडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्तीचे प्रयत्न केले जातात. या शेती कामांसाठी एकरी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.परंतु सततच्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकाच्या भोदामधील विद्राव्य खते, रासायनिक खते, सूक्ष्म खते व सेंद्रिय खते ही पाणी जास्त झाल्यामुळे पाण्याबरोबर वाहून गेली. त्यामुळे या महत्त्वाच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये द्राक्षांच्या वेलींचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकले नाही. भोदामधील द्राक्षवेलीच्या मुळ्या कुजल्यायामुळे द्राक्ष वेलींना वरील अन्नद्रव्य उचलता आली नाहीत.तसेच संपूर्ण पाच महिन्यात सूर्यदर्शन न झाल्यामुळे द्राक्ष वेलींची काडी शेकली गेली नाही नाही. कोणतेही झाड हे सूर्यप्रकाशा मध्येच प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे पानांमधील हरितलवके यांच्या साह्याने अन्ननिर्मिती करत असते. परंतु सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे द्राक्षवेलीच्या काड्या- फांद्यांमध्ये अन्नद्रव्य साठवू शकली नसल्यामुळे यावर्षी या या वेलींना द्राक्ष घडांची वीण होऊ शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या बागांवर यावर्षी काही ठिकाणी एकही गड लागला नाही तर काही ठिकाणी घड आले पण ते खराब हवामानामुळे जिरून गेले.घड आले ते कमकुवत राहिले. यामुळे द्राक्ष बागायत शेतकरी आर्थिक दृष्ट्या आणखी अडचणीत गेले. बुडत्याचा पाय आणखी खोलात गेला. गेल्या हंगामात ऐन द्राक्ष विक्रीच्या वेळी लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे द्राक्ष बागायतदार उध्वस्त झाले. होते त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्राक्ष बागांचे शंभर टक्के नुकसान दाखवायला हवे होते. परंतु ते 50 टक्के पर्यंतच दाखवले गेले. त्यामुळे द्राक्ष बागांचे नुकसानभरपाईचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.त्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करु. कालच केंद्र सरकारचे पाहणी पथक येऊन गेले यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन आम्ही द्राक्ष बागायतदारांना ज्यादा नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.