मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारस॔हिता लागू झाली आहे. सदर निवडणुकांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांतते मध्ये पार पडण्यासाठी मोहोळ पोलीस स्थानक प्रमुख पोलीस निरीक्षक श्री सायकर यांनी भीमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संवेदनशील गावांमध्ये औपचारिक सभा घेऊन सर्व पॅनलप्रमुख केंद्रप्रमुख, कार्यकर्ते यांना एकत्र बोलावून निवडणुका शांततेत मध्ये पार पाडण्याचे आवाहन केले.मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर हे अतिसंवेदनशील गाव म्हणून पोलिस दफ्तरी नोंद असुन याठिकाणी सभेमध्ये मार्गदर्शन करताना श्री. सायकर म्हणाले, "आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रचार करणे अत्यंत गरजेचे असून जर कोणी नियमभंग करत असेल व कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निवडणूक प्रचारादरम्यान जातीयतेच्या आधारावर मते मागणे, जातीय द्वेष पसरवणे हे बेकायदेशीर असून कुणाही व्यक्तीचे मुद्दामून चारित्र्यहनन करणारा मजकूर, चुकीची माहिती,असंसदीय भाषा अर्वाच्य भाषा, लोकांच्या भावना भडकवणारी भाषणं अथवा लिखाण सोशल मीडिया वरून प्रसारित करणे हे घटनाबाह्य असल्यामुळे अशा व्यक्तींवर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल. प्रचारासाठी वापरण्यात येणारे ध्वनिक्षेपक कर्णे यांचा आवाजमर्यादा नियमांच्या आधीन ठेवून प्रचार करावा.राजकीय बॅनर लावू नये. मोटरसायकलच्या सायलेन्सर च्या पुंगळ्या काढून फोटो सायकल वेगाने चालवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुणीही ही कुठल्याही उमेदवार तथा मतदार अथवा गट यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.ज्यांच्यावर तडीपारीची ची कार्यवाही झालेली आहे त्यांना तडीपार ठेवावे लागेल. झुंडशाही, दादागिरी किंवा कोणत्याही कृतीद्वारे दहशत निर्माण करणार्यांवर त्वरित कठोर गुन्हे दाखल केले जातील.मते मिळवण्यासाठी पैसे वाटणे व पैसे स्वीकारणे दोन्हीही कायदेशीर गुन्हे असुन तसा चुकूनही कोणी प्रयत्न करू नये.
मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने साहेबांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून दाखवल्यास त्या गावांना 30 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केल्यामुळे शक्यतो निवडणूका प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता आपसात बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. निवडणूक जिंकून अंतिमतः लोकसेवा व गावाचा विकास हेच अंतिम ध्येय असते आणि ते साध्य करण्यासाठी पैशांचा चुराडा करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध घडवून आणू सर्वांनी मिळून गावाचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करावा एकमेकांमध्ये वैर निर्माण होईल असे वर्तन करू नका कारण राजकीय वैमनस्यातून काहीवेळा वाद विकोपाला गेलेली उदाहरणे दिसून येतात असे न करता निवडणूका बिनविरोध घडाव्यात यासाठी गावातील नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा तसेच लोकांसाठी जे वेळ देऊ शकतात,ज्यांच्या मनात लोकसेवाभाव,ज्यांना प्रशासकीय अनुभव आहे अशा माणसांना संधी द्यावी. व्यक्तीगत मतभेद किंवा वैर दाखविण्याचे हे ठिकाण नाही किंवा भ्रष्टाचार करून पैसे मिळविण्याचा हा मार्ग नसून केवळ सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या जबाबदार व सक्षम नागरिकानी ही निवडणूक लढवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री.सायकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सर्व पॅनल प्रमुख प्रा. संग्राम चव्हाण, पत्रकार सुनील चव्हाण, हिंमत पाटील,दुसऱ्या पॅनलचे प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, अशोक चव्हाण तसेच तिसरी आघाडी पॅनल प्रमुख सिद्धेश्वर अनुसे,बंडू अनुसे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सोनटक्के, पोपट सोनटक्के ,दिनेश चव्हाण अर्जुन बनसोडे,रहीमबक्ष तांबोळी व मोहोळ पोलीस स्थानक येथील सर्व स्टाफ उपस्थित होता.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.