पंढरपूर // प्रतिनिधी
भोसे ग्रामपंचायत निवडणुकीत ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ६ जागांसाठी होणारी निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतील ११ उमेदवारांची बिनविरोध निवड हीच, कोरोना महामारीत दगावलेल्या दिवंगत भोसेवासियांना श्रद्धांजली असल्याचे मत, भोसे परिवर्तन पॅनलचे नेते हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर ,भोसे ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पस्ट झाले. ११ उमेदवार बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर भोसे परिवर्तन पॅनलकडून पत्रकारपरिषद घेण्यात आली. यावेळी कल्याणराव काळे यांचे समर्थक सत्ताधारी विरोधी गटाचे नेते हनुमंत मोरे हे बोलत होते. याप्रसंगी परिचारक गटाचे प्रमुख राजकुमार टरले, आ. बबनदादा शिंदे गटाचे प्रमुख हरिचंद तळेकर तसेच प्रा. महादेव तळेकर आदी उपस्थित होते.
भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात न उतरता , ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भोसे परिवर्तन पॅनलने ठोस भूमिका घेतली होती. भोसे गावातील नागरिकांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कोरोना महामारीत सर्वात जास्त मनुष्यहानी भोसे गावातच झाली होती . या महामारीत गावातील ५० ते ६० नागरिकांना प्राण गमवावे लागले , यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीस सामोरे जाण्यात नागरिकांना स्वारस्य नव्हते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा अनेक जाणकार मंडळींनी बोलून दाखवली होती. या नागरिकांच्या भावनेची कदर करून, सत्ताधारी पाटील गटाकडे सत्ता ठेवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय विरोधी भोसे परिवर्तन पॅनलकडून घेण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
विरोधी पॅनलकडून एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आला नाही. यामुळे भोसे ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी ११ जागेवरचे उमेदवार बिनविरोध झाले . उरलेल्या ६ जागेसाठी निवडणूक होत आहे परंतु ही निवडणूक केवळ औपचारिकता म्हणून लढली जाणार आहे , असे मत कल्याणराव काळे यांचे समर्थक हनुमंत मोरे यांनी यावेळी व्यक्त केले. भोसे ग्रामपंचायत निवडणुकीत ११ उमेदवार बिनविरोध होणे, हीच या गावातील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाटील विरोधी गटाचे अजय जाधव विलास तळेकर यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांच्या भावनेची कदर करण्यासाठी भोसे परिवर्तन पॅनलकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या विरोधात एकही उमेदवार उभारणार नाही , याबाबतची घोषणा केली होती. या निर्णयाचे ग्रामस्थांकडून समर्थन करण्यात आले होते. असे असताना या घटनेबाबत माध्यमामध्ये एक वृत्त प्रसिद्ध झाले होते.यामध्ये स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले होते. या खोडसाळ वृत्तीचा निषेध यावेळी करण्यात आला. समाजात चीड निर्माण करण्याचे काम लिखाणातून होऊ नये, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.