यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ह्या संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली कोविड-१९ परिस्थितीत प्रथमच ही सभा व्हर्चुअल पद्धतीने झाली आहे. ऊस व साखर उत्पादनाच्या यंदाच्या स्थितीबाबत चर्चा या सभेत झाली असून भारतामध्ये यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता आहे. २५० ते २६० लाख टन साखरेचा खप लक्षात घेता व मागील हंगामातील ३६.०७ लाख टन साखरेचा विचार करता जवळ जवळ १८० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. केंद्र शासनाकडून साखर निर्यात व इथेनॉल उत्पादन वाढीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम योजनाबद्ध पद्धतीने राबविला जाणे आवश्यक आहे. कारण जागतिक साखर किमतीवर याचा परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रात अंदाजे १०० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. मात्र इथेनॉल उत्पादनासाठी "बी" हेवी मळीचा वापर होणार असल्याने अंदाजे १० ते १५ लाख टन साखर कमी होऊ शकते. मात्र मुबलक साखरेच्या उपबब्धतेमुळे त्याचा साखरेच्या किमतीवर परिणाम होईल असे चित्र दिसत नाही.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ऊस व साखर उत्पादनात आघाडीवर होते. परंतू गेल्या तीन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. त्यांचे दर हेक्टरी उत्पादन ७२.३८ वरून ८०.८२ टनावर गेले आहे व साखर उतारा १०.६१ टक्क्यांवरून ११.७३ टक्के इतका वाढला आहे.
उत्तर प्रदेशचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी मला असे कळविले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने २०१७-१८ पासून ३६ कलमी कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमामुळे ऊस क्षेत्र, ऊसाचे दर हेक्टरी उत्पादन, साखरेचा उतारा, पर्यायाने साखर उत्पादन, मळीचे उत्पादन, वीज निर्मिती आणि इथेनॉल उत्पादन यामध्ये भरीव वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा महाराष्ट्राने जाणीवपूर्वक विचार करणे मला आवश्यक वाटते असे मत मा.खा.शरद पवार यांनी सभेत व्यक्त केले.
मा.खा.शरद पवार पुढे म्हणाले की; यावर्षी राज्यात पाऊस चांगला झाल्याने ऊसाखालील क्षेत्र वाढून ते जवळपास ११ लाख हेक्टर झाले आहे. त्यामुळे साखर कमी करून आपण इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारत सरकारने इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम चांगल्या पद्धतीने राबवण्याचे धोरण स्वीकारले असून विविध स्रोतांद्वारे तयार होणाऱ्या इथेनॉलला वाढीव दर दिलेला असून हा इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण यात जास्तीत जास्त सहभाग घेऊन इथेनॉलचे जास्तीत जास्त उत्पादन करून तेल कंपन्यांना पुरवठा करावा आणि साखरेचे साठे कमी करण्यास मदत करावी.
आता केंद्र सरकारने ऊसाचा रस आणि ऊसाचा पाक म्हणजे सिरप यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिलेली आहे. माझी अशी माहिती आहे की यासाठी इन्सिनरेशन बॉयलरची आवश्यकता नाही. व यातून निर्माण होणारा स्पेंटवॉश शेत जमिनीवर एकवेळ नियंत्रित वापर करू शकतो
ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांमध्ये स्पेंटवॉशचा वापर शेतीसाठी करण्यात येतो अशी माझी माहिती आहे. स्पेंटवॉश डायरेक्ट बायोकम्पोस्टसाठी वापरता येतो. त्यामुळे खर्चात बचत होते. याकरता लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.