(आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू)
सोलापूर // प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील माचनुर शिवकृपा पेट्रोल पंपाच्या टाकीत पाइप टाकून मोटारीच्या सहाय्याने दीड हजार लिटर (किंमत एक लाख 24 हजार 350 रुपये) डिझेलची चोरी केल्या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध मंगळवेढा पोलिस गुन्हा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विवेक पाटील (वय 40, रा. हरिनयन पार्क, पंढरपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे सासरे शिवाजी पाटील (रा. ब्रह्मपुरी) यांच्या नावावर मंगळवेढा रस्त्यालगत माचणूर हद्दीत एच. पी. कंपनीचा शिवकृपा पेट्रोलपंप असून, त्यावर मॅनेजर औदुंबर पाटील यांच्यासह आठ जण कामावर आहेत. ता. 8 रोजी नितीन तात्यासाहेब बेदरे (रा. बठाण), अंकुश गोसावी (रा. ब्रह्मपुरी) हे कामावर होते. त्याच दिवशी रात्री 11.58 वाजता टाकीतील डिझेलची अँटी मशिनवर तपासणी केली असता 21.0241 होते. 9 फेब्रुवारीला पहाटे 5.15 वाजता काम संपवून घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल तपासणी सकाळी 8.15 वाजता केली असता 1500 लिटर डिझेल कमी आढळले.
मॅनेजरने टाकीला गळती झाली आहे, का याची तपासणी केली असता तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही. वरील प्रकार फोनवरून मॅनेजर औदुंबर पाटील यांनी सांगितला. त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लगत असलेल्या शेतामध्ये पाहणी केली असता त्या ठिकाणी डिझेल सांडल्याच्या खुणा व रिकामे कॅन आढळून आले. त्या वेळी डिझेल मोटारीच्या सहाय्याने चोरून नेल्याची फिर्यादीची खात्री झाली. याप्रकरणी 1500 लिटर डिझेल चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस या चोरीचा तपास करीत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.