सोलापूर // प्रतिनिधी
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 2020 - 21 चा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू असून, गुरुवारी (ता. 11) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने कारखान्याच्या 30 व 50 टनी वजन काट्याची अचानक तपासणी केली. यामध्ये वजनकाटा बिनचूक व तंतोतंत बरोबर असल्याचा अहवाल वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
भीमा साखर कारखान्याच्या वजन काट्याची वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली. यामध्ये याच विभागाने पूर्वी केलेले सील सुव्यवस्थित होते. या वेळी सोलापूर वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक पी. एच. मगर यांनी काट्यावर उसाने भरलेल्या दोन ट्रॅक्टरचे प्रत्यक्ष वजन घेतले व रिकाम्या ट्रॅक्टरचेही वजन घेतले.
त्या वेळी वजन काटे तंतोतंत व बरोबर असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार नसल्याचा अहवाल निरीक्षक श्री. मगर यांनी दिला.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरळीतपणे व चांगला चालू असून, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, वाहन मालक व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे, ही भीमा कारखान्याच्या दृष्टिकोनातून मोठी जमेची बाजू आहे. ऊस उत्पादकांच्या उसाची पहिली उचल त्यांच्या बॅंक खात्यात प्रतिटन दोन हजार रुपये याप्रमाणे जमा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय व दर दिला आहे.
या वेळी कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे, चीफ इंजिनिअर परमेश्वर आसबे, शेती अधिकारी एम. ए. पाटील, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.
:-
वैद्य मापन समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी केली असता तो वजन काटा अत्यंत अचूक व तंतोतंत बरोबर आला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाच्या कामकाजावर शिक्कामोर्तब झाले आहे!
धनंजय महाडिक
चेअरमन भीमा शुगर



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.