पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भाजप व राष्ट्रवादी पक्षाला हा मतदारसंघ सुटला असला तरी दोन्ही पक्ष सध्या संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात धनगर समाजाची मतदान संख्या लक्षणीय असल्याने दोन्ही पक्ष ही ताकद कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहील यासाठी चाचपणी करत आहे. धनगर समाजाने या मतदारसंघात यशवंत सेनेच्या वतीने अपक्ष उमेदवार दिला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यशवंत सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय माने यांनी गाठीभेटीच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधला असल्याने त्यांच्यापाठीमागे धनगर समाजाची व इतर बहुजन समाजाची ताकद पाठिशी असल्याने सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. भाजप कडून समाधान अवताडे की परिचारक यांच्या गटातील उमेदवार हे नक्की न झाल्याने भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. तसेच राष्ट्रवादी च्या वतीने दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागल्याने त्यांच्याच घरातील उमेदवार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार की धनगर समाजाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून आहे. परंतु अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने, वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार संजय माने यांना चर्चेस निमंत्रण दिले होते. वंचित बहुजन आघाडी व यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाने पुण्यातील श्री. आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मतदारसंघातील अनेक विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली व सकारात्मकरित्या दोन्ही शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली असल्याने या मतदारसंघातील पोटनिवडणूकीचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचा उदय पंढरपूर येथून झाल्याने या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. धनगर समाजासह इतर बहुजन समाजाची ताकद एकवटली तर या मतदारसंघाचे वादळ नक्कीच पेटणार आहे व निकालाचे चित्र बदलाचे दिसणार.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.