वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीपासून ज्येष्ठे अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्याचा खुद्द मिथून चक्रवर्ती यांच्याकडून इन्कार केला जात होता. काल (६ मार्च) सायंकाळी मिथून यांनी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात होतं. त्यामुळे मिथून चक्रवर्ती फक्त मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावणार की पक्षात प्रवेश करणार याकडे लोकांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं असून, पंतप्रधानांच्या सभेपूर्वी त्यांनी कमळ हाती घेतले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जोरदार प्रचार सुरू आहे. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये प्रचाराचा पारा वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. हे वृत्त खरं ठरलं आहे. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं. मात्र, बंगालच्या राजकीय वर्तुळात मिथून चक्रवर्ती भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची आज (७ मार्च) कोलकाता प्रचारसभा आहे. यातच काल मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली. त्यामुळे मिथून भाजपात प्रवेश करणार असल्याच जवळपास निश्चित मानलं जात होतं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.