राज्यमंत्री मा .ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पर्यटनास लवकरच मंजुरी मिळेल.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कराड तालुक्यातील गमेवाडी येथील निसर्गरम्य कुशीत असलेल्या प्राचिन श्री जटेश्वर मंदीर वनपर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वनविभासह जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. २0२१-२२ ते २0२३-२४ पर्यंतचा हा विकास आराखडा तयार करुन त्याबाबतचा प्रस्ताव साताऱ्याच्या उपवनसंरक्षकांकडून डिसेंबरमहिन्यात कोल्हापूरच्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना पाठविण्यात आला आहे. वनविभागाकडुन हा आराखडा राज्यसरकारच्या येत्या अर्थसंकल्पात ठेवण्यात येणार असून अर्थसंकल्पात या आराखड्यास निधीची तरतूद झाल्यास श्री जटेश्वर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे गमेवाडीसह तांबवे विभागातील जनतेचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
कराड तालुका वनपरिक्षेत्रात तांबवे विभागातील गमेवाडीच्या हद्दीत प्राचिन श्री जटेश्वर मंदीर आहे. प्राचिन काळात पांडवांनी एका रात्रीत हे मंदीर बांधले. परंतू सुयार्ेदय झाल्यामुळे ते मंदीराचे शिखर बांधू शकले नाहीत, अशी आख्यायिका या मंदीराबद्दल सांगितली जाते. ब्रिटीशकालीन कागदपत्रांत नोंद असलेल्या या मंदीराच्या परिसरात महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेले श्री भैरवनाथ मंदीर, अस्वस्थामा मंदीर, गोरखचिंचेचे झाड असलेले श्री गोरक्षनाथ मंदीर अशी अनेक मंदीरे, प्रसिध्द असे तळीपठार, नैसर्गिक तळी, धबधबे, रेखीव सुयार्ेदय व सुर्यास्त नजारे, विविध औषधी झाडे या शिवाय या परिसरातील डोंगर पठारावरुन कोयना नदीचा 'सी पॉईन्ट' दिसतो. येथे विविध प्रकारचे वन्यप्राणी, पक्षी, किटक अशी विपूल वनसंपदा पहायला मिळते. देवदर्शनासाठी येणाऱ्यांची व पर्यटकांची येथे नेहमीच ये-जा सुरु असते. या वनपर्यटनाचा विकास झाल्यास येथील निसर्गसंपदेचे संरक्षण, संवर्धन होऊ शकते, आणि वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात होऊ शकते, हे ओळखून या ठिकाणी वनपर्यटनाला चालना देण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. तसेच सातारा व कराड वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्तपणे सर्व्हे करुन आराखडा तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार कराड वनविभागाकडून श्री जटेश्वर वनपर्यटन विकास आराखडा तयार करुन तो साताऱ्याच्या उपवनसंरक्षकांना तर उपवनसंरक्षकांकडून कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांना डिसेंबर महिन्यातच सादर करण्यात आला आहे. त्याअंतर्गंत आराखड्यातील कामांसाठी २०२१-२२ साठी २७४.१८ लाख, २०२२-२३ साठी २६०.१८ व २०२३-२४ साठी २४३.४६ लाख रुपये निधीची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.
निसर्ग पर्यटन आराखड्या अंतर्गत येणार्या बाबी,
या आराखड्यांतर्गंत वनतळे, वनतळ्यामधील गाळ काढणे, पॅगोडा, रेलिंग तयार करणे, फेरोक्रेटस्वागत कमान, पाण्याची टाकी, पाईपलाईन, मजूरकुटी, निसर्गपथावरील पायऱ्या, निरीक्षण मनोरे, लाकडी आभासाचे पूल, नक्षत्र वन / वनौषधी लागवड, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती, झाडांना दगडी कट्टे, निसर्ग पायवाटा, सौर पथदिवे, बायोडाजेस्टर टॉयलेट बसविणे, फेरोक्रेट बेंचेस बसविणे, कचराकुंड्या, चित्ररुप माहिती फलक बसविणे, उंच रोपांची लागवड, संरक्षक भिंत, रोपवाटिका, जलमृद संधारणाची कामे, पक्षांसाठी खाद्य व पाण्याचे पॉंड, सुयार्ेदय व सुर्यास्त ठिकाणी चौथरे, पर्यटकांसाठी खुले माहिती केंद्र, झाडावरील छोटं घर, प्राणी निरिक्षणांसाठी लपनगृह, बांबू घर, तात्पुरते मुक्कासाठी तंबू, ओपन जीम, साहसी खेळ सुविधा, पर्यटकांसाठी खेळणी, वणवा नियंत्रण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यास अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्यानंतर या कामांना गती येणार आहे. त्यामुळे गमेवाडीसह संपूर्ण तांबवे विभागातील जनतेचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटकांची भेट.
पांडवकालीन श्री जटेश्वर मंदीर व प्रसिध्द श्री भैरवनाथ मंदीर परिसरात दरवर्षी देवदर्शन व पर्यटनासाठी सुमारे दीड लाखांवर पर्यटक भेट देतात. त्यामुळे हे ठिकाण वनपर्यटन म्हणून विकसीत केल्यास पर्यटकांची संख्या २० ते २५ टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळून जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन होईल. स्थानिक ग्रामस्थांच्या वनव्यवस्थापन समितीमार्फत हा प्रकल्प राबविल्यास वर्षाला ५ लाखांपेक्षा अधिक महसूल जमा होईल. त्यामधून स्वच्छता, संरक्षण व संवर्धनाची कामे तसेच पर्यटकाभिमुख सुविधा निर्माण करता येतील. त्यामुळे या वनपर्यटनास चालना मिळावी, अशी मागणी विभागातील जनतेतून सातत्याने होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.