सोलापूर // प्रतिनिधी
वाढत्या कोरोनाचा प्रभाव आता पंढरीतही दिसू लागला असून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठीचे ऑनलाईन बुकिंग अर्ध्यावर आणण्यात आली असून १७ मार्चपासून केवळ १५०० भाविकानाच या बुकिंगच लाभ घेता येणार आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे १७ मार्च २०२० पासून विठ्ठल मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने १५ नोव्हेंबर २०२० पासून भाविकांना मुखदर्शन खुले केले होते. अद्यापही विठ्ठल रुक्मिणीचे पददर्शन घेण्यास परवानगी नाही. कोरोन परतीच्या मार्गावर असल्याचे दिसू लागल्याने पददर्शन लवकरच सुरु होईल ही आशा निर्माण झाली होती परंतु कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागला आणि शिथिल झालेले एकेक नियम पुन्हा कडक होताना दिसत आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाच्या ऑनलाईन बुकिंगवरही याचा परिणाम झाला असून ही मर्यादा अर्ध्यावर आणण्याचा निर्णय मंदिरे समितीने घेतला आहे .
ऑनलाईन पद्धतीने दर्शन पास बुकिंग करून दरदिवशी तीन हजार भाविकांना मुखदर्शन घेता येत होते. आता १७ मार्चपासून केवळ १५०० भाविकांनाच या दर्शन पास बुकिंगचा लाभ घेता येणार आहे. भाविकांची ही संख्या कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार आज मंदिरे समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली आणि सदर निर्णय घेण्यात आला. उद्या बुधवारी १७ मार्चपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.