पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत इच्छुकांची भाऊगर्दी




(कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष)

 

 सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, कोण आमदार होणार? याची उत्सुकता वाढली आहे. आमदार (कै.) भारत भालके यांचे पुत्र, श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके किंवा (कै.) भालके यांच्या पत्नी जयश्री भालके तसेच दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे, परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे तर डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, शिवसेनेच्या शैला गोडसे हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार, हे निश्‍चित आहे. 


पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात सलग तीन वेळा (कै.) भारत भालके यांनी बाजी मारून हॅट्ट्रिक केली होती. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली होती. आजारी असताना देखील ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली. पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगीरथ यांचेच एकमेव नाव पुढे आले. 


तथापि, निवडणुकीसाठी इच्छुक असलेले डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे वक्तव्य जाहीरपणे केले आहे. परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. 


(कै.) भारत भालके यांच्या निधनानंतर माजी आमदार (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. परंतु संचालक भगीरथ भालके यांचे नाव पुढे केल्याने भगीरथ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. युवराज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी भगीरथ भालके यांच्या नावाला जाहीर विरोध केला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीवरून देखील धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत भगीरथ भालके यांच्याऐवजी जयश्री भारत भालके यांच्या नावाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्राधान्याने विचार होण्याची शक्‍यता आहे. तथापि, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्याप कोणालाही उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले नाहीत. 


आ. प्रशांतराव परिचारक‌ काय निर्णय घेणार

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मुदत आणखी साधारण एक वर्ष आहे. त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरवावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. परंतु, आमदार प्रशांत परिचारक यांनी अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या वेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार, की भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget