पंढरपूर // प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांनी तत्काळ बेडची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शेगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरु असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा, मुबलक प्रमाणात औषधसाठा, ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध ठेवावा. शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवावी. संपर्क साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तत्काळ तपासणी करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासनाने तर ग्रामीण भागात आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जास्तीत-जास्त रुग्णांना लाभ मिळवून द्यावा. खासगी पॅथॉलॉजीमध्ये तपासणी केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी उपस्थित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. यावर संबंधितांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही श्री. शंभरकर यांनी यावेळी दिले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.