२५२-मंगळवेढा - पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा गेला एक महिना उडत होता, त्यासाठी आज मतदान होत आहे. खरंतर ही निवडणूक दुर्दैवाने लागली, भारत नानांच्या अकाली निधनाने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली, पण कोरोनाने फक्त भारत नानाच नाही तर त्याच विठूमाऊलींच्या पंढरीतले हजारोंचे तारणहार असलेले मोठे मालक सुधाकरपंत परिचारकही हिरावून नेले.
गेले काही दिवस या निवडणुकीत जवळून काही गोष्टी पाहिल्या, मतदारसंघात काही प्रवासही झाला. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या.
भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाने यंदा पांडुरंगाच्या आशीर्वादाने दामाजी पंतांचा सेवक मुंबईला न्यायची जोरात तयारी केलीय. तर इकडे विठ्ठल परिवार भगीरथालाही मुंबईला घेऊन जाऊ इच्छितोय.
खरंतर भारत नाना गेल्यानंतर पंढरीला वाली कोण असा प्रश्न पडला तेव्हा आपसूक लोकांच्या मनात पांडुरंग परिवार आला. अन या निवडणुकीत बेरजेचं राजकारण करण्यात भारतीय जनता पार्टी सरस ठरलेली दिसतेय. कारण दरवेळी भारत नानांच्या मतांपेक्षा जास्त मते समाधान आवताडे आणि परिचारक (पांडुरंग) परिवार घ्यायचा, पण दोघांच्या उमेदवारी वेगळ्या असल्याने मतांचे विभाजन व्हायचे आणि दरवेळी आमदारकीची झुल चकवा द्यायची, यंदा मात्र थोडं सावध होत परिचारकांनी हे आमदारकिचं सावज सोडायचं नाही हा निश्चयच केला, आमदारकी मला नाही तर आपल्याला मिळावी यासाठी ते दोन पाऊल मागे आले आणि आपली सगळी ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावत यंदा दामाजी पंतांचा सेवक पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुंबईला पाठवायचाच हे ठरवलं. इकडे भगीरथ भालके यांनी आमदार व्हावं हे खुद्द राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांना मनापासून वाटत नाही, वरवर कसेही असले तरी आतून करेक्ट कार्यक्रम करण्याच्या बेतात काहिजण दिसतात. अख्खी राष्ट्रवादी अन पवार परिवार इकडं मुक्कामाला आला असला तरी त्यांचा इरादा मात्र विठ्ठल साखर कारखाना मोडीत काढून बारामती ऍग्रोच्या नावावर करण्याचा असल्याचं ऐकायला मिळालंय.
राजकारणात भगीरथ तसा नवा अन जिल्हा परिषद निवडणुकीत नाना आमदार असतानाच पराभव झालेला उमेदवार आहे, चलाखी करत आता नानांचा भास व्हावा व लोकांना भावनिक करता यावं यासाठी मेकअप अन ड्रेसिंगही नानांची कॉपी केलीय, भगीरथ यांच्या अख्ख्या प्रचारात मतदारसंघाच्या विकासाचा पत्ता नाही, व्हिजन नाही, पण कपडे, दाढी, चष्मा, आवाज, चालणं यावर मात्र खूप लक्ष दिलंय. पण जर अशा नकला करून आमदार होता येत असतं तर सगळे नकलाकार आमदारच असले असते. तो भाग निराळा.
आज स्वातंत्र्याला 70 वर्षे होऊन गेली पण मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावांना आपण हक्काचं पाणी देऊ शकलो नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अन ते हक्काचं पाणी बारामतीने पळवलं हे त्याहून लाजिरवाणे आहे. आज तालुक्यात रोजगार नाही, पाणी नाही, उद्योग नाही, महिला सबलीकरण नाही.
विठ्ठल कारखाना आहे तो तर दिवाळखोरीत निघाल्यातच जमा आहे, कारण एकेकाळी 60 कोटी ठेव असलेला कारखाना आज 610 कोटी कर्जात आहे. कारखाना उभारण्यासाठी लोकांनी घरं - जमिनी गहाण ठेऊन पैसे गोळा केले मात्र आज शेतकऱ्यांचा कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेलाय. तथाकथित अर्जुन बँकेचा घोळ असेल, सूत गिरणीच्या उभारणीचा घोटाळा (?) असेल, विठ्ठल बझारचा घोटाळा (?) असेल अशा अनेक संस्थांमध्ये अनियमितता दिसल्याने भगीरथ भालकेंचा पाय खोलात बुडाला आहे. भावनिक झाल्याने लोकं तालुका ताब्यात देतीलच असं नाही, कारण नानांचा मुलगा हे सोडून कर्तृत्व काय हा प्रश्न केल्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ताही निरुत्तर होतो.
एवढंच नाही तर भगीरथ भालकेंची चौफेर नाकेबंदी आहे, इकडे राजू शेट्टींनी स्वाभिमान जागा ठेऊन पंढरपूर तालुक्यातलाच आपला एक उमेदवारही रिंगणात आणला आहे, कारखानदार नको बिल्लावाला निवडून द्या असं म्हणतात मात्र याचा झटका भगीरथ भालके यांनाच बसणार आहे, अपक्ष उमेदवार असलेल्या शैला गोडसे यातर शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची सेनेतून हकालपट्टी झाली आहे. आणि सेनेचा पाठिंबा हा भगीरथ भालके यांना आहे, आता शैला ताईनी आपली उमेदवारी कायम ठेवत विशेषतः प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यात जोरदार प्रचारात रंगत आणली आहे, त्यामुळे सेनेच्या वाट्याची मतं शैला ताई घेतील म्हणजे भगीरथ भालके यांना पुन्हा एक दणका बसणार आहेच. अगोदरच डेंजर झोनमध्ये असलेले भालके आता अजून खोलात गेले आहेत, त्याशिवाय धनगर समाज आणि दलित समाज यांचेही काही उमेदवार असल्याने छोट्या छोट्या गटात मतांची विभागणी होणं अटळ आहे.
समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या समोर विकासाचे व्हिजन ठेवले आहे, जनतेचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तर आपल्या जाहीर सभेत मंगळवेढ्याला हक्काचं पाणी देण्यासाठी केंद्राकडून निधी आणण्याचा शब्दच दिला आहे, त्याशिवाय समाधान दादाला मुंबईला पाठवा राज्यातला करेक्ट कार्यक्रम करतोच या वाक्यामुळे भाजपामय वातावरणाला चार चांद लागले आहेत. कारण महाआघाडीच्या दळभद्री कारभाराला अवघी जनता वैतागली आहे, विशेषतः आघाडीबाबत पंढरपूर शहरात तर प्रचंड विरोध आणि राग आहे.
मंगळवेढा तालुका हा समाधान दादांचा बालेकिल्ला आहे, तिथे भूमिपुत्र फॅक्टर जोरात आहे, तर इकडे पंढरपूर तालुक्यात पांडुरंग परिवार अगदी तहानभूक विसरून प्रचारात मश्गुल आहे, समाधान आवताडे यांना निवडून देणं हीच मोठ्या मालकांना श्रद्धांजली असल्याचं आमदार प्रशांत परिचारक म्हणत आहेत, त्याला अनुसरून उमेश परिचारक, प्रणव परिचारक आणि सगळा पांडुरंग परिवार मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांच्या पाठीशी उभा आहे. समाधान आवताडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, आणि जरी झाला तरी इकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीचा उमेदवार ती मतांची विभागणी सहज भरून काढेल.
असलेल्या संस्था व्यवस्थित चालवणं आणि लोकांच्या मनात घर करून राहणं हे पांडुरंग परिवाराचे वैशिष्ट्य आहे, तर उत्कृष्ठ आणि यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता हे समाधान दादांचं वैशिष्ट्य आहे, याचा संगम आणि भारतीय जनता पार्टीची साथ यामुळे यंदा पंढरीत कमळ फुलणार हे नक्की आहे. यामुळे पंढरपूर व मंगळवेढाकरांना दोन आमदार मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत मोहिते पाटील परिवार पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे याचाही फायदा समाधान दादा यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे मोहिते पाटील परिवाराने हे निवडणूक अगदी मनावर घेऊन प्रशांत मालक समाधान दादा यांना एकत्र करून एक दिलाने यंत्रणा लावली आहे.
भगीरथ भालकेंच्या प्रचाराला आलेल्या अजित दादांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आणि वैयक्तिक शेरेबाजींनी पंढरपूर तालुक्यातला सामान्य मतदार नाराज झाला आहे, गेल्या 70 वर्षात पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या हक्काचं पाणी पळवणाऱ्या बारामतीच्या पवारांना यंदा चंद्रभागेचं पाणी दाखवायचं हा चंगच त्यांनी बांधला आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.