सोलापूर // प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट किती गंभीर आहे, याचा अंदाज आता सर्वांनाच येऊ लागला आहे. बाधित रुग्ण कोरोनाशी संघर्ष करत आहेत तर त्यांचे नातेवाईक बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर मिळविण्यासाठी प्रशासनासोबत दिवस-रात्र झगडत आहेत. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची सध्याची स्थिती विदारक आहे. गरिबांना चिंतेत टाकणारी आहे.
घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याला चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णांची बेड शोध मोहीम सुरू होते. महापालिकेच्या डॅशबोर्डवरील उपलब्ध बेडची स्थिती पाहून रुग्णाचे नातेवाईक बहुतांश हॉस्पिटलशी संपर्क साधतात. डॅशबोर्डवर बेड उपलब्ध दाखवत असताना देखील अनेक रुग्णालये सुरवातीलाच नकारघंटा वाजवतात. आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, असेच पहिले उत्तर देतात. कुठेच व्यवस्था होत नसल्याचे पाहून शेवटी अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. खासगी रुग्णालयाकडे बेड नाहीत आणि सर्वोचार रुग्णालयात बेड मिळालाच तर येथील अस्वच्छता आणि विदारक स्थितीचा सामना रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे.
सर्वोपचारमधील रुग्ण कोरोनाशी तर त्या रुग्णाचे नातेवाईक येथील प्रशासनाची प्रचंड संघर्ष करत आहेत. ए ब्लॉकमध्ये असलेल्या बारा वॉर्डासाठी अवघ्या चार सर्व्हंटची सध्या नियुक्ती केली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आवश्यक त्या वस्तू, स्वच्छता या बाबी हाताबाहेर गेल्या आहेत. रुग्ण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दिवसातून किमान तीन वेळा स्वच्छता आवश्यक असताना दिवसातून एकदाच स्वच्छता केली जात असल्याचे समोर येत आहे. कोरोनापेक्षाही सर्वोपचारमधील स्वच्छता व सुविधा भयावह असल्याचा अनुभव अनेक रुग्ण सांगत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.