कोल्हापुर येथील जिल्हा दुध उत्पादक संघ ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून नवनवी राजकीय समीकरणे उदयास येत असून याच अनुषंगाने आ. प्रकाश आवाडे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे.इचलकरंजी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर त्यांच्या काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनाही त्यांनी अर्ज माघार घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ‘गोकुळ’ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय आवाडे गटाने घेतला.
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधी दोन्ही आघाडीतील नेत्यांकडून त्यांची मनधरणी झाली होती. दरम्यान, बुधवारी माजी खा. राजू शेट्टी व अशोकअण्णा चराटी या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. याच अनुषंगाने आ. प्रकाश आवाडे यांनीही सत्ताधारी गटाला झुकते माप दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. त्यामुळे आ. आवाडे गट सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या पाठीशी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अनेकांनी थेट पाठिंबा दिला, तर काही जणांचा छुपा पाठिंबा आहे. यामध्ये वस्त्रनगरीचे आ. प्रकाश आवाडे यांनी सुरुवातीलाच तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात उभा करण्याचे सुतोवाच केले.
परंतु, शहरातील कोरोनाची स्थिती पाहता त्यांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग न घेता कोरोना काळात नागरिकांना मदत करण्याचे धोरण राबविणार असल्याचे सांगितले. सध्या काही दिवसावर ‘गोकुळ’ची निवडणूक आली, तरी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही. त्यामुळे आ. आवाडे गटाचे ठरावधारक संभ—मावस्थेत आहेत. यामुळे बदलती राजकीय समीकरण पाहता सध्यातरी आ. प्रकाश आवाडे यांचा कल सत्ताधारी आघाडीकडेच जास्त असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.