- या पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो म्हणूनच पक्ष प्रवेश केला असे भगत यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नवी मुंबई शहरात एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे माजी नगरसेवक नामदेव भगत यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र नुकतेच त्यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते, त्यांचा सन्मान ठेवला जातो म्हणून पक्षात प्रवेश केला. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पूर्ण करेन, असा विश्वास भगत यांनी व्यक्त केला.
सिडकोचे माजी संचालक व नवी मुंबई महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांचे नवी मुंबईच्या राजकारणात चांगले वर्चस्व राहिले आहे. नवी मुंबईतील मातब्बर नेत्यांमध्ये भगत यांच्या नावाचा समावेश होतो. काँग्रेसला रामराम ठोकून काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले भगत यांनी पुन्हा पक्ष बदलण्याची तयारी सुरू केली होती. अनेक उलटसुलट चर्चाना या राजीनाम्यानंतर वेग आला होता. स्वतः भगत यांनी पुढील भूमिकेबद्दल मौन बाळगले होते. मात्र आज शुक्रवार (३० एप्रिल) रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, भगत यांच्या प्रवेशावेळी उपस्थितांना संबोधित करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक जरी पक्ष सोडून गेले तरी आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत असे सांगत नामदेव भगत यांच्या येण्याने पक्षाला नवी मुंबईत उभारी येईल असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहोत. त्यामुळे अनेक जण प्रभावित होऊन राष्ट्रवादीत येऊ इच्छितात, या भावनेतूनच नामदेव भगत यांनी पक्षात प्रवेश केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच भगत यांनी सामाजिक, राजकीय जीवनात प्रचंड काम केले आहे. लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे नामदेव भगत यांच्या रुपाने एक खंदा कार्यकर्ता पक्षाला लाभला असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.