कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळ रुग्णसंख्येत भर पडतेय. या पार्श्वभूमीवर रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावेत, ऑक्सिजन सुविधा असावी आणि त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत असा समाजहिताचा व्यापक विचार करुन महाडिक परिवारातर्फे कोल्हापुरात १२५ बेडचे ऑक्सिजनयुक्त अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांवरील उपचार व औषधे मोफत असतील. तसेच त्यांना भोजन, नाष्टाही मोफत राहील. याशिवाय योगा व आरोग्य विषयक उपक्रम असतील. खासगी हॉस्पिटललाही लाजवेल अशा पद्धतीने कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचा महाडिक परिवाराचा मानस आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम समोरील महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत हे सेंटर होणार आहे. या पाच मजली इमारतीमध्ये १२५ बेड असणार आहेत. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेऊन १२५ बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीच्या सहकार्याने हे सेंटर होत आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. सोमवारी, ता. १० मे रोजी त्यांनी त्या इमारतीची पाहणी केली. तेथे उपलब्ध करावयाच्या आवश्यक सुविधासंबंधी चर्चा केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, महेश वासुदेव, किरण नकाते, संग्राम निकम,समीर शेठ, शिवप्रसाद घोडके, मनोज नलवडे, उत्तम पाटील, आदिनाथ खोत, माणिक महाडिक,प्रशांत बर्गे, श्रीधर हांडे बांधकाम व्यावसायिक अमृत शहा आदी उपस्थित होते.
या पाच मजली इमारतीमध्ये एकूण १२५ बेड असणार आहेत. प्रत्येक बेडला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सुविधा असेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा असेल. कोव्हिड केअर सेंटरसाठी आवश्यक बेड व इतर साहित्याचे ऑर्डर दिले आहे. येत्या आठवडाभरात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
लहान मुलासाठी वीस बेडची सुविधा
आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असेल अशी शक्यता वर्तविली आहे. तेव्हा लहान मुलांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी १२५ पैकी २० बेड हे लहान मुलासाठी राखीव असतील.
चौकोट:-
कोरोनाग्रस्त रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी अद्ययावत असे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. केअर सेंटरसाठी आवश्यक साहित्यांचे ऑर्डरी दिल्या आहेत. याठिकाणी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत दिली जाईल. औषधोपचारासह नाष्टा, भोजनाची सोय असेल. सध्यस्थिती पाहता रुग्णांच्या सोयीसाठी हे कोव्हिड केअर सेंटर वर्षभर चालू राहील या पद्धतीने उभारणी करण्यात येणार आहे.
धनंजय महाडिक, माजी खासदार



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.